माणगाव ः प्रतिनिधी
शेतकर्यांच्या शेतातील भाजीपाला थेट ग्राहकांच्या दारी या संकल्पनेसाठी निर्धार सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लॉकडाऊन काळात शेतकर्यांच्या शेतातील भाजीपाला व अन्य वस्तू विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी आल्या होत्या. या काळात शेतातील भाजीपाल्याचे नुकसानही झाले होते. ग्राहकांनाही भाजीपाला योग्य व वेळेत उपलब्ध होत नव्हता. अनेकांना त्रास सहन करावा लागला. ही बाब लक्षात घेऊन सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत निर्धार सामाजिक संस्थेच्या पदाधिकार्यांनी शेतातील भाजीपाला थेट ग्राहकांच्या दारी ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली आहे. ना नफा ना तोटा या तत्त्वावर ही संकल्पना राबविण्यात येत असून ग्राहकांचाही अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे. वाशी, बेलापूर, पनवेल या शहरी भागात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. निर्धार सामाजिक संस्थेचे पदाधिकारी निलेश आहेर आणि त्यांच्या सहकार्यांच्या संकल्पनेतून हे शक्य झाले आहे.