
मोहोपाडा : प्रतिनिधी
कोरोना पार्श्वभूमीवर विवाह सोहळ्यावरही बंधन आल्याने गर्दी न करता ठराविक नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे. रसायनीनजीकच्या कसळखंड येथील धन्वंती घरत आणि रोहिदास जुनघरे यांचा विवाह सोहळा अगदी साध्या पध्दतीने गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन करण्यात आला. या वळी विवाह सोहळ्याचा खर्च वाचवून वधुवरांच्या हस्ते आसपासच्या परिसरातील आदिवासी गोरगरीब बांधवांना कपडे व महिनाभर पुरेल इतके धान्यासह किराणा सामान वाटप करण्यात आले. लग्नाला होणारा अनाठायी खर्च न करता तो गोरगरीबांना मदतीसाठी खर्च करा, त्यांचे आशीर्वाद मिळेल असे वर रोहिदास जुनघरे व वधु धन्वंती घरत यांनी बोलताना सांगितले. लॉकडाऊन काळात विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन वधुवरांनी केले. यापुढे विवाह सोहळे थाटामाटात न करता अनाठायी खर्च करू नये अशी मागणी या वधुवरांनी करुन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.