भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप
अलिबाग ः प्रतिनिधी
आत्महत्या केलेले इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी 2014मध्ये 19 घरांची खरेदी केली, मात्र सहा वर्षे ती नावावर केली नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बेनामी संपत्तीच्या व्यवहारात सहभागी होते, असा आरोप भाजपचे माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी गुरुवारी (दि. 7) कोर्लई येथे पत्रकार परिषदेत केला. भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, वैकुंठ पाटील, अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे या वेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे तसेच वायकर परिवार यांनी मुरूड तालुक्यातील कोर्लई येथे जमीन विकत घेतली आहे. डॉ. किरीट सोमय्या यांनी सदर जमिनीच्या व्यवहाराची माहिती माहिती अधिकारात ग्रामपंचायतीकडे मागितली होती. ग्रामपंचायतीने दिलेल्या माहितीची पडताळणी करण्यासाठी डॉ. किरीट सोमय्या गुरुवारी कोर्लई ग्रामपंचायत येथे आले होते. या वेळी त्यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली.
अन्वय नाईक यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे तसेच मनीषा रवींद्र वायकर यांनी कोर्लई येथील जमीन खरेदी केली. 21 मार्च 2014 रोजी त्याची कागदपत्रे पूर्ण झाली, परंतु या जमिनीवर 19 घरे आहेत.
त्याचे एकूण बांधकाम 23 हजार 500 चौरस फूट आहे. राज्य सरकारच्या रेडी रेकनरप्रमाणे त्याचे मूल्य पाच कोटी 29 लाख रुपये आहे. जी कागदपत्रे सादर करण्यात आली ती जमिनीची आहेत, 19 घरांची कागदपत्रे केली नव्हती. 13 नोव्हेंबर 2020 रोजी ती पूर्ण केली. पत्नीच्या नावावर असलेल्या 19 घरांचा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रात केला नाही. ती माहिती त्यांनी लपविली, असा आरोप भाजप नेते डॉ. किरीट सोमय्या यांनी केला आहे.
कोर्लई येथे रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी अन्वय नाईक यांची जमीन व घर 2014 साली खरेदी केले होते. 2020मध्ये जमिनीवरील ही घरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांच्या नावे करण्यात आली आहेत. सहा वर्षे ही संपत्ती बेनामी होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बेनामी संपत्तीच्या व्यवहारात सहभागी होते, असा आरोप डॉ. सोमय्या यांनी केला आहे.
जमीन खरेदी झाली, परंतु घरे नावावर झाली नव्हती. अन्वय नाईक यांचा मृत्यू 2018मध्ये झाला. 2020मध्ये ही घरे रश्मी ठाकरे व मनीषा वायकर यांच्या नावावर झाली. ही घरे नावावर करताना अन्वय नाईक यांची ना हरकत आवश्यक होती. तेव्हा मृत असलेल्या अन्वय नाईक यांची ना हरकत कशी मिळवली? या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आम्ही रायगड जिल्हाधिकारी व रायगड पोलीस अधीक्षकांकडे करणार आहोत, अशी माहितीही डॉ. किरीट सोमय्या यांनी या वेळी दिली.