महाराष्ट्रात सर्वाधिक बळी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारताने शनिवारी (दि. 3) कोरोना रुग्णांच्या मृत्यूंचा एक लाखांचा टप्पा ओलांडला, तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या 64 लाखांवर पोहोचली आहे. देशातील एकूण मृत्यूसंख्येत महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा असून, राज्यात आतापर्यंत सुमारे 38 हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील मृत्यूदरदेखील 2.67 टक्के इतका जास्त आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.
देशात 76 वर्षीय व्यक्तीचा 13 मार्च रोजी कोरोनाच्या संसर्गाने पहिला मृत्यू झाला होता. त्यानंतर या सहा महिन्यांच्या काळात कोरोना संसर्गामुळे मृतांची संख्या एक लाखांच्या वर गेली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, देशात शनिवारी सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये 79,476 नवे रुग्ण आढळून आले असून, 1,069 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 64,73,544वर पोहचली, तर 1,00,842 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण संख्या असलेल्या महाराष्ट्रात अद्यापही मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 14,16,513वर पोहोचली असून, 37,480 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या राज्यांचा क्रमांक लागतो.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले
देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी सध्या 9,44,996 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत, तर 54,27,706 रुग्ण बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे भारताचे प्रमाण चांगले आहे. ते 83.84 टक्के आहे. मृत्यूचे प्रमाणही दिवसेंदिवस कमी होत असून, ते सध्या 1.56 टक्के आहे. आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, देशात शुक्रवारी 11,32,675 कोरोनाच्या नमुन्यांची चाचणी झाली, तर आजवर 7,78,50,403 इतक्या चाचण्या पार पडल्या आहेत.