कर्जत : बातमीदार – रोटरी क्लब ऑफ देवनारने ग्रामीण रोटरी क्लबच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील अनेक माध्यमिक आणि प्राथमिक शाळांमध्ये सामाजिक उपक्रम राबविले. आता त्यांनी शेलू, चई, मांडवणे, हेदवलीमध्ये शेतकर्यांना शेती बियाणे, पाणी शुद्धीकरण संच, जलशुद्धीकरण मशीन, बोअरवेल यांची मदत केली असून, त्याचे लोकार्पण करण्यात आले.
रोटरी क्लबकडून शेलू ग्रामपंचायत हद्दीतील बेडीजगाव तेथे बंद असलेली बोअरवेल दुरुस्ती करून त्या बोअरवेलमध्ये समर्सिबाल पंप टाकण्यात आला आहे.त्यातून शुद्ध पाणी बेडीसगावमधील आदिवासींना मिळणार आहे. बेडीसगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी शुद्धजल फिल्टर प्लांट बसविण्यात आला आहे. त्याचबरोबर हेदवली, चई, मांडवणे तसेच गौळवाडी येथील माध्यमिक विद्यालयात जलशुद्धीकरण संच बसविण्यात आले. या सर्व उपक्रमांचे लोकार्पण रोटरी क्लब ऑफ देवनारचे अध्यक्ष प्रबोध शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास ‘रोटरी’चे माजी अध्यक्ष लीलाधर परब, शेलू ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजी खारीक, उपसरपंच बुद्धिबाई दरवडा, कर्जत तालुका रोटरी समन्वयक अर्जुन तरे, सामाजिक कार्यकर्ते अरुण मसणे, अनंता मसणे, बागडे गुरुजी, अशोक वाघ यांच्यासह संदीप तरे, ज्ञानेश्वर खडेकर,प्रभाकर खडेकर आदी उपस्थित होते. या वेळी बेडीसगाव येथील रायगड जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा राठोड यांनी येथील प्राथमिक शाळा दत्तक घेण्याचे आवाहन रोटरी क्लबला केले.