पाली : प्रतिनिधी – कोरोनाच्या महामारीत अव्वाच्या सव्वा वाढीव वीज बिलांनी सुधागड तालुक्यातील जनता प्रचंड त्रस्त झाली आहे. वाढीव वीज देयके आणि महावितरणच्या कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे जनतेत प्रचंड संताप दिसून येत आहे. या संतप्त वीज ग्राहकांना घेऊन मनसेचे सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे यांनी महावितरणच्या पाली येथील कार्यालयाला घेराव घातला. अधिकारी जनतेच्या भावनांशी खेळत आहे. त्यांनी ग्राहकांचा अधिक अंत पाहू नये, असा इशारा या वेळी देण्यात आला.
सुनील साठे व पदाधिकार्यांनी महावितरणचे पाली येथील कार्यकारी उपअभियंता जतिन पाटील यांच्यासोबत चर्चा केली. येत्या दोन दिवसांत वाढीव वीज बिलांवर तोडगा काढा; अन्यथा आमचा संयमाचा बांध फुटला तर खळ्खट्याक करावे लागेल, असा इशारा त्यांनी या वेळी दिला.
मनसेचे विभाग अध्यक्ष केवल चव्हाण, उपाध्यक्ष अल्पेश दळवी, परेश वनगले आदी पदाधिकार्यांसह वीज ग्राहक महावितरणच्या कार्यालयात उपस्थित होते.