Breaking News

भांदरे नदीवरील पूल कोसळला; काळ प्रकल्प अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

माणगाव : प्रतिनिधी

काळ प्रकल्पाचा भांदरे चौकीजवळील व नदीवरील पूल कोसळल्याने गेल्या दोन महिन्यांपासून परिसरातील मळेगाव आदिवासीवाडी, हातकेळी, मुगवली, कविळवहाळ व भांदरे या गावांचा संपर्क तुटला असून, ग्रामस्थांचा शेतावर जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. पूल तुटल्याची माहिती सरपंचांनी सर्व संबंधित विभागांना दिली असूनही दोन महिने होत आले तरी काळ प्रकल्पाचे कोणीच अधिकारी घटनास्थळी आले नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोकण पाटबंधारे विभागाचे गेल्या काही वर्षांपासून काळ प्रकल्पाकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक ठिकाणी पूल कोसळले आहेत. साकव नादुरुस्त झाले असून कालव्यांचीही फार मोठ्या प्रमाणात नादुरुस्ती झाली आहे. अशा परिस्थितीत अतिवृष्टीमुळे  6 ऑगस्ट 2020 रोजी भांदरे चौकीजवळील पूल कोसळला व पुलाखालील जलवाहिन्यांचेसुध्दा फार मोठे नुकसान झाले आहे. या ठिकाणी तातडीने नवीन पूल उभारण्यासाठी शासनाकडून मंजुरी घ्यावी आणि ग्रामस्थांची अडचण दूर करावी यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी काळ प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांना लेखी निवेदने दिली आहेत, मात्र दोन महिने उलटून गेले तरी परिस्थिती जैसे थेच आहे. दरम्यान, भांदरे चौकीजवळील पूल कोसळल्याने सद्यस्थितीत स्थानिक ग्रामस्थ आणि विद्यार्थीवर्गाला त्रास होत असून काळ प्रकल्प अधिकार्‍यांच्या ढिसाळ कारभारावर शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. हा पूल तातडीने दुरुस्त करावा किंवा या ठिकाणी नव्याने पूल उभारण्यात यावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत.

नागाव पाल्हे खाडी पुलाची दुरवस्था; नवा साकव उभारण्याची मागणी

रेवदंडा : प्रतिनिधी

अलिबाग तालुक्यातील नागाव ग्रामपंचायत हद्दीतील नागाव-पाल्हे खाडी पुलाची दुरवस्था झाली असून नित्य वाहतुकीला हा पूल धोकादायक झाला आहे. या ठिकाणी नव्याने साकव पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागाव ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे करण्यात आली आहे. नागाव पाल्हे बायपास रस्त्यावर श्री समर्थनगरनजीक जुना जीर्णावस्थेत खाडी पूल आहे. या पुलावरून नित्याने अवजड वाहतूक होत असते, परंतु हा खाडी पूल नादुरूस्त असल्याने केव्हाही पडण्याची शक्यता आहे. पूल पडल्यास येथून जाणार्‍या-येणार्‍या ग्रामस्थांची मोठी गैरसोय होणार आहे. लवकरात लवकर या पुलाचे नव्याने बांधकाम करण्यात यावे, या मागणीचे निवेदन नागाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply