Breaking News

रोह्यात परतीच्या पावसाचे थैमान

धाटाव ः प्रतिनिधी

कोरोनामुळे हातावर पोट असलेल्या शेतकरीवर्गाने आपला रोजगार गमावला. त्यातून सावरताच निसर्ग चक्रीवादळाने शेतकर्‍यांच्या फळबागा, घरे उद्ध्वस्त केल्यामुळे त्यांचे कंबरडे मोडले होते. त्यातील अनेक जण शासकीय मदतीपासून वंचित आहेत. त्यातच शनिवारी झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची वेळ आली आहे. पावसाने धुवाँधार बॅटिंग करीत संपूर्ण तालुक्याला झोडपून काढले. धाटाव, कोलाड, खांब विभाग, मेढा, चणेरा या भागात वादळी वार्‍यासह पाऊस कोसळला. त्यामुळे कापलेले भात कसेबसे जमा करून ते घरी पोहचविण्यासाठी शेतकर्‍यांची धावपळ उडाली.  रायगड जिल्हा भातशेतीचे कोठार मानला जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाताचे पीक घेतले जाते. शेतातील पीक घेतल्यानंतर शेती झोडल्यावर शेतकरी आपल्या पोटापुरते धान्य ठेवून उर्वरित धान्यातून शेतीसाठी घेतलेल्या उचलीची परतफेड करतो. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने लावणी वेळेवर झाली. चांगले पीक मिळेल या अपेक्षेने शेतकरी आनंदी होता. यंदाची दिवाळी कुटुंबासोबत साजरी करण्याचे शेतकर्‍यांनी ठरविले होते, परंतु तालुक्यातील 80 ते 90 टक्के भातशेती कापण्यालायक झाली असता परतीच्या पावसामुळे हाताशी आलेली भातशेती चिखलात झोपली. त्यामुळे शेतकर्‍यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. आता तरी या संकटातून बाहेर पडण्यासाठी शासन स्तरावर पंचनामे करून मदत मिळेल, अशी शेतकर्‍यांना अपेक्षा आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर भातपिकाचे स्वप्न धुळीस मिळाल्याने दिवाळी अंधारातच घालवायची का, असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply