Breaking News

पनवेल शहरातून रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता होतोय चकाचक

पनवेल : वार्ताहर

पनवेल शहरातून रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी मुख्यत्वेकरून तीन रस्त्यांचा वापर केला जातो. माल धक्याकडे जाणारा रस्ता पर्यायाने छोटा आहे. साई मंदिरा वरून येणारा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे.

पनवेल हे उपनगरीय रेल्वे वाहिनीवरील महत्त्वाचे रेल्वे स्टेशन तसेच कोकण रेल्वे वरील महत्त्वाचा टप्पा ठरणारे रेल्वे स्टेशन अशी ओळख असून सुद्धा पनवेल शहरातून रेल्वे स्टेशन कडे जाणारे रस्ते मात्र नेहमी शापीत राहिले होते. जनभावनेचा आदर करत पनवेल महानगरपालिकेने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ते रेल्वे स्थानक या रस्त्याला प्राधान्य देत 18 मीटर रुंदीचा रस्ता करण्याचे काम हाती घेतले. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन झेनीथ कन्स्ट्रक्शन कंपनीला या कामाचे कंत्राट देण्यात आले. एप्रिल 2019 ला प्रत्यक्ष कामाची सुरुवात झाली. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असल्या कारणामुळे विविध थरिय भराव टाकून, सिमेंट काँक्रिटीकरण करून रस्ता बनवणे खरोखरच एक आव्हान होते. या रस्त्याच्या बाजूला दाट झोपडपट्टी असल्याकारणामुळे तेथील सांडपाण्याच्या वाहिन्या, भूमिगत गटारे, विद्युत जोडण्या, टेलिफोनच्या लाइन्स, अतिक्रमणे या अडथळ्यांबाबत देखील नियोजन करणे गरजेचे होते.

नवी मुंबई परिवहन सेवेच्या पनवेल परिसरातील सर्वच मार्गांची सुरुवात रेल्वेस्थानकापासून होते त्यामुळे त्या वाहनांची देखील या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात वर्दळ असते. झेनिथ कंपनीने प्रदीर्घ अनुभव तसेच कुशल मनुष्यबळाच्या जोरावर सर्व आव्हानांवर लीलया मात करत उत्कृष्ट नियोजनाचा नमुना पेश केला आहे. जवळपास 600 मीटर लांबी असलेल्या या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून दुतर्फा बंदिस्त गटारांच काम देखील पूर्ण झाले आहे.पथदिवे,पदपथ यांची कामे जवळ जवळ पूर्ण झाली असून विभाजकाचे काम अंतिम टप्प्यात आहे. प्रकल्प अभियंते तेजस भंडारी यांनी साधारण महिन्याभरात या रस्त्याचे काम संपूर्ण होईल असे सांगितले.

तसेच इतकी आव्हाने असताना सुद्धा अवघ्या सव्वा वर्षात काम अंतिम टप्प्यात आल्याबद्दल त्यांच्या टीम मधील समन्वय कामी आला असे सांगितले. दरम्यान महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, परिवहन विभाग यांनी चोख कामगिरी बजावत उत्तम समन्वय दर्शविल्याने हे काम विक्रमी वेळेत होत आहे. स्टेशन कडे जाणारा रस्ता चकाचक होत असल्याने पनवेलकर समाधान व्यक्त करत आहेत.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply