रायगड : जिमाका
लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाच्या सर्व बाबी व्यवस्थित नोंदवाव्यात अशी सूचना निवडणूक खर्च निरीक्षक निलांक कुमार यांनी सहाय्यक खर्च निरीक्षकांना दिली. रायगड मतदार संघातील मतदारांच्या मतदान संबधित काही तक्रारी असल्यास त्यांनी आपल्या भ्रमणध्वनी क्रमांक 9158719876 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
निलांक कुमार यांनी नुकताच रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात येथील निवडणुक पूर्वतयारी बाबत आढावा घेतला. या बैठकीस जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, उपजिल्हा निवडणुक अधिकारी वैशाली माने तसेच रायगड लोकसभा मतदारसंघातील पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, दापोली व गुहागर या विधानसभा क्षेत्रासाठी नियुक्त केलेले सहाय्यक खर्च निरीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणुक कामासंबधित सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रायगड मतदारसंघातील निवडणुकपूर्व तयारीचे सादरीकरण केले. मतदारसंघात नेमण्यात आलेल्या विविध पथकांची विधानसभा क्षेत्रनिहाय माहिती व विविध प्रशिक्षणांची माहिती देण्यात आली.
निवडणूक खर्च निरीक्षक निलांक कुमार यांनी सहाय्यक खर्च निरीक्षक यांना खर्चाच्या बाबी कशा नोंदवाव्यात याबाबत मार्गदर्शन केले. तसेच खर्च नोंदविण्यापूर्वी संबधित पथकांनी खर्च विषयक सर्व बाबी समाविष्ट होतील, याबाबत काळजी घेणेबाबत सूचना दिल्या. निलांक कुमार यांनी या वेळी निवडणुक कामासाठी असलेल्या मीडिया सेल आणि नियंत्रण कक्षास भेट दिली.
अवैध दारू, रोख रकमा यावर लक्ष ठेवावे
निवडणूक खर्च निरीक्षक निलांक कुमार यांनी शुक्रवारी (दि. 29) जिल्हाधिकारी कार्यालयात रायगड व रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, आयकर व उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व बँकाचे प्रतिनिधी यांच्यासमवेत निवडणूक कामाचा आढावा घेतला. या वेळी त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागांने आवश्यक तपासण्या करुन अवैध दारु मतदारसंघात न येण्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना केल्या. आयकर विभागाने जप्त केलेल्या रोख रक्कमांबाबत खात्री करुन नियमाप्रमाणे आवश्यक कार्यवाही करावी. निवडणुका निपक्ष:पातीपणाने व शांततेने होण्यासाठी सर्व पथकांनी काळजीपूर्वक काम करण्याबाबत निर्देश निलांक कुमार यांनी या वेळी दिले.