कर्जत ः बातमीदार
परतीच्या पावसाने कर्जत तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतीची 100 टक्के नासाडी झाली असून या नुकसानीचे शासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकर्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी गुरुवारी (दि. 15) भाजप किसान मोर्चाच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अवकाळी आणि वादळी पावसामुळे कर्जत तालुक्यातील सर्व गावांतील भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील उभे पीक खराब झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्या अनुषंगाने शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी भाजप किसान मोर्चाच्या वतीने कर्जत तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून त्वरित मदत देण्यात यावी, अशी मागणी भाजप किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. या वेळी कोकण संपर्कप्रमुख सुनील गोगटे, प्रदेश सचिव अशोक गायकर, भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष परशुराम म्हसे, भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, कर्जत नगरपरिषद उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, उद्योग आघाडी जिल्हा मंदार मेहेंदळे, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष विनायक पवार, संयोजक शहर सरचिटणीस प्रकाश पालकर, वसंत महाडिक आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.