कोल्हापूर ः प्रतिनिधी
एखाद्या गावात भ्रष्टाचार झाला असेल तर संपूर्ण जलयुक्त शिवार योजनेतच गैरव्यवहार झाल्याचा महाविकास आघाडी सरकारचा आरोप हास्यास्पद असल्याचा टोला मारतानाच खुशाल चौकशी करा, तुम्हाला अडवतंय कोण, असे आव्हानच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (दि. 15) पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारला दिले. राजकीय सूडभावनेने घेण्यात आलेल्या अशा निर्णयांना आम्ही घाबरणार नाही. आरेमधून कारशेड हलविण्याचा निर्णय अंगाशी आल्यानेच जलयुक्त योजनेच्या चौकशीचा निर्णय घेतल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. भाजपने जलयुक्त शिवार योजनेतून पावसाचा प्रत्येक थेंब साठवण्याचा प्रयत्न केला. सरकारी निधीबरोबरच लोकनिधीचाही त्यासाठी वापर केला. या योजनेमुळे शेतकर्यांना फायदा झाला. जमिनीतील पाणी पातळी वाढली. तरीही केवळ राजकीय सूडबुद्धीने त्याची चौकशी करण्याचा निर्णय झाला. यामध्ये लोकांचा सहभाग होता म्हणून त्यांंचीही चौकशी करणार का, असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला आहे. या योजनेतून 22 हजार गावांत सहा लाखांवर कामे झाली. त्यामध्ये केवळ 120 गावांत चौकशी करून कॅगने अहवाल दिला. नऊ हजार कोटींच्या योजनेत एक दोन गावांत भ्रष्टाचार झाला असेलही. त्याला स्थानिक प्रशासन, जिल्हाधिकारी जबाबदार आहेत. त्यांची चौकशी करा. एका गावातील भ्रष्टाचाराला संपूर्ण सरकारला जबाबदार धरणे योग्य नाही. त्या गावातील योजनेची चौकशी करून कारवाई करा, असेही त्यांनी सांगितले.