पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अधिकार्यांनी गुरुवारी (दि. 15) महापालिका हद्दीतील कोविड रुग्णालयांचा संयुक्त पाहणी दौरा केला. या दौर्यात त्यांनी एमजीएम हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय, देवांशी इन व टियारा हॉल या कोविड सेंटर्सची पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी या सेंटर्समध्ये पुरवल्या जाणार्या सुविधा उत्तम दर्जाच्या असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. पनवेल महानगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. खासगी दवाखान्यांत रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात वेगवेगळे खर्च दाखवून लाखोंची बिले बनवून लुबाडणूक सुरू असताना महापालिकेने सुरू केलेल्या कोविड रुग्णालयांचा आढावा घेण्यासाठी महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, पनवेल महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, मुख्य लेखाधिकारी मनोजकुमार शेट्ये यांनी कोविड रुग्णालयांची पाहणी केली. या वेळी त्या ठिकाणी रुग्णांना मिळत असलेल्या विविध सोयीसुविधांची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून घेण्यात आली. येथील रुग्णांशी संपर्क साधून त्यांच्याकडून त्यांना काही अडचणी आहेत का याबाबतची माहिती घेण्यात आली. तसेच त्या सोडविण्याबाबत प्रशासनाला आदेश देण्यात आले.