गेल्या तीन-चार दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि मुंबई-कोकणाचा भाग मुसळधार पावसाने झोडपून काढला आहे. येथील सारे जनजीवन विस्कटून गेले. याच सुमारास तिकडे हैदराबादमध्ये तर पुराचे पाणी शहरामध्ये घुसून धडधाकट माणसे वाहून जात असतानाची दृश्ये टीव्हीवर ज्यांनी पाहिली असतील, त्यांच्या अंगावर नक्कीच काटा आला असेल. अशीच काहिशी परिस्थिती आपल्या नजिकच्या पुणे शहरात उद्भवली त्याची सरकारला पर्वा आहे काय?
यंदाचे वर्ष अनेक अस्मानी संकटांना निमंत्रण देणारे ठरले. हे वर्ष उजाडले आणि महिनाभरातच कोरोनाच्या जागतिक संकटाची चाहूल लागली. फेब्रुवारी महिन्यातच कोरोनाचे संकट भारतावर घोंघावू लागले होते. पुढे त्याने किती उग्र रूप धारण केले हे आपण पाहतोच आहोत. विशेषत: यंदाच्या वर्षी महाराष्ट्राला जे भोगावे लागले त्याची तुलना कुठल्याच महासंकटाशी होऊ शकणार नाही. कोरोना महामारीच्या पाठोपाठ महाराष्ट्रातील शेतकर्यांना पावसाने यंदा जबरदस्त दणका दिला. निसर्ग चक्रीवादळाने कोकणपट्टीचे अपरिमित नुकसान केले. पावसाच्या या उग्र तांडवातून एरव्ही कोरडा राहणारा मराठवाडा देखील सुटला नाही. विदर्भात तर सोयाबीनचे पीक पूर्णत: झोपले आहे. कोकण, मराठवाडा किंवा विदर्भ असो, कुठल्याही भागातील पर्जन्यग्रस्त शेतकर्याच्या हलाखीची राज्य सरकारने किंचितही दखल घेतली नाही. किंबहुना, येथील दुर्दैवी शेतकरी आजही मदतीसाठी टाहो फोडत आहे. त्यांच्या दिशेने 12 ते 18 कोटींच्या तुटपुंज्या मदतीचे तुकडे तेवढे फेकण्यात आले. कोरोना महामारीमध्ये सारेच जगणे अशाश्वत झाले असताना, पावसाने उभे केलेले आव्हान महाराष्ट्रातील जनतेच्या पेलण्यापलीकडचे होते. त्यातच परतीच्या पावसाने जाता जाता दिलेला तडाखा महाराष्ट्राच्या वर्मी बसला असणार. पुणे शहरात आणि आसपासच्या इलाख्यात बुधवारी प्रचंड पाऊस कोसळला तेव्हा तेथील रहिवाशांना ढगफुटी झाली की काय, अशी भीती वाटली. रस्त्यावरील मोटारी पाण्यामध्ये तरंगू लागल्या. आधीच कोरोना महामारीमुळे पुणे परिसरातील इस्पितळे गजबजली आहेत. तेथील रुग्णांच्या हालास पारावार उरला नाही हे वेगळे काय सांगावयाचे? परतीच्या पावसाचा हा जबर तडाखा शहरी भागांना तर बसलाच, पण शेतकर्यांची अवस्था तर अधिकच केविलवाणी झाली. एरव्ही या महिन्यापर्यंत शेतशिवारातील पीक हाती आलेले असते. शिवारामध्ये उभी असलेली धान्यसंपदा पुढे येणार्या सुगीची स्वप्ने दाखवित असते. उंबरठ्यावर येऊन ठेपलेली दिवाळी खुणावत असते. चाकरमान्यांच्या मनामध्ये बोनसचे विचार घोळू लागलेले असतात. परंतु यंदा यातील काहीही घडणार नाही हे परतीच्या पावसाने निश्चित केले. वास्तविक कोरोनाच्या संकटाशी संंपूर्ण देश चांगला मुकाबला करत असताना शेतकरी बांधवांनी अपार मेहनत घेऊन आपापली शेते चांगली फुलवली-फळवली होती. यंदा विक्रमी धान्य उत्पादन होणार याची चाहूल अर्थतज्ज्ञांना लागली होती. परंतु महाराष्ट्रात तरी आता असा दावा करता येणार नाही. महाराष्ट्राच्या हातात जे काही उरले होते ते परतीच्या पावसाने ओढून नेले. पर्यावरणातील बदल या नैसर्गिक संकटाला कारणीभूत आहेत हे तर उघडच आहे. निसर्गापुढे कुणाचे काहीच चालत नाही. परंतु या बदलांची योग्य ती दखल घेऊन सरकारने तसे नियोजन करण्याची गरज आहे. निसर्गाला आव्हान देणे शक्य नसले तरी अशा परिस्थितीत मार्ग काढावा लागतोच. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती मात्र हवी. त्याचा मात्र महाराष्ट्रात सध्या दुष्काळच आहे.