भाजप दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा यांची मागणी
पाली : रामप्रहर वृत्त – परतीच्या पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपले आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या भात पीकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेवून जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व नुकसान भरपाई देऊन शासनाने बळीराजाला दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा यांनी केली असून. त्याबाबतचे निवेदन गुरुवारी (दि. 15) विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांना आहे.
संकटाच्या काळात जिल्ह्यातील बळीराजाला सरकारकडून मदत मिळावी, या करिता भाजपने कंबर कसली आहे. त्या अनुषंगाने राजेश मपारा यांनी गुरुवारी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. व शासनाने रायगड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यावी, याबाबतचे निवेदन दिले.
रायगड जिल्ह्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. मात्र यावर्षी भात पीक तयार झाले असताना परतीच्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. तयार झालेल्या भातपीकाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. अशा परिस्थितीत ओला दुष्काळ जाहीर करून राज्य शासनाने शेतकत्यांना मदतीचा हात द्यावा, असे राजेश मपारा यांनी या निवेदनात म्हटले आहे.