पंप हाऊसमध्ये बिघाड, जलवाहिनीलाही गळती
खालापूर : प्रतिनिधी
नगर पंचायतीच्या पाणीपुरवठा यंत्रणेत बिघाड झाल्याने तसेच जलवाहिनीला जागोजाग गळती लागल्याने खालपूरमध्ये गेल्या चार दिवसांपासून पाणी टंचाई भासत आहे. दरम्यान, नागरिकांना अंघोळ तसेच दैनंदिन कामांसाठी पागोळीचे पाणी वापरावे लागत असून, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
तालुक्यातील कलोते धरणातून खालापूर शहराला पाणी पुरवठा केला जातो. मात्र तेथील पंप हाऊसमध्ये बिघाड झाल्याने तसेच जलवाहिनीला गळती लागल्याने गेल्या चार दिवसांपासून खालापूर शहराला पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे शहराला पाताळगंगेचे पाणी पुरविण्यात येत आहे. मात्र ते पाणी पिण्यायोग्य नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
सध्या पडणारा अवकाळी पाऊस शेतकर्यांना नकोसा वाटत असला तरी खालापूरकरांना मात्र अवकाळी पावसाने दिलासा दिला आहे. पागोळीचे पाणी अंघोळ व इतर कामासाठी वापरण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. मात्र पिण्यासाठी त्यांना विहिरीची वाट धरावी लागत आहे.
दरम्यान, कलोते येथील पंप हाऊसमधील दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून, जलवाहिनीला जागोजागी लागलेली गळती थांबविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र खंडित वीज पुरवठयामुळे त्यात व्यत्यय येत आहे.
दोन ठिकाणची गळती दूर करण्यात आली आहे. जोरदार पाऊस आणि वारा यामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याने कामे पूर्ण होण्यास वेळ लागत आहे. पाणीपुरवठा विभाग अभियंता सतत कलोते येथे कामावर तैनात आहेत. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल.
-राहुल चव्हाण, पाणीपुरवठा सभापती, खालापूर नगरपंचायत
कलोत धरणातून पाणीपुरवठा होत नसल्याने खालापूर शहराला सध्या पाताळगंगा नदीतून पाणीपुरवठा करण्यात येत आहे, मात्र हे पाणी केमिकल मिश्रीत व दूषित असल्याने नागरिकांनी त्याचा वापर पिण्यासाठी करू नये.
-मनोज कळमकर, ग्रामस्थ, खालापूर