आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास ही म्हण खरी भासावी असे राज्य सरकारचे आजवरचे वर्तन राहिले आहे. परतीच्या पावसाच्या तडाख्यानंतर सर्वपक्षीय नेतेमंडळी शेतकर्यांच्या बांधावर धावली. विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला दौरा जाहीर करताक्षणी सत्तेतील महाबिघाडी सरकारचे तालेवार नेते खडबडून जागे झाले आणि लगोलग शेतकर्यांच्या बांधावर धावले.
परतीच्या पावसाच्या तडाख्यात महाराष्ट्रातील शेतकरी हाती आलेले पीक गमावून बसला आहे. कोरोना महामारीचे महाभयंकर संकट एकीकडे आणि सरकारकडून होणारे अक्षम्य दुर्लक्ष दुसरीकडे अशा दुहेरी कात्रीत महाराष्ट्रातील शेतकरी बांधव पार पिचून गेले आहेत. त्यातच पावसाच्या असह्य मार्याने भर घातली. परतीच्या पावसाने तर जाता जाता महाराष्ट्राला असा काही तडाखा दिला आहे की, आभाळाकडे डोळे लावून बसण्याची देखील सोय उरली नाही. शेतकर्यांची इतकी वाईट अवस्था कधीच झाली नव्हती. परतीचा पाऊस मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्राला जोराचा तडाखा देऊन गेला. विदर्भाची गत तर यापूर्वीच तशीच झाली आहे. कोकणाचे कंबरडे निसर्ग चक्रीवादळामुळे आधीच मोडून पडले आहे. राज्यातील सोयाबीनचे पीक जवळपास संपूर्णत: नष्ट झाले आहे.
महागा-मोलाचा ऊस देखील पार झोपला आहे. लाखो हेक्टर जमिनीवरील उभी पीके जमिनदोस्त झाल्यामुळे हे वर्षच पूर्णत: वाया गेले आहे. अशा परिस्थितीत शेतकर्यांनी कोणाकडे पहावे, ज्यांच्याकडे आशेने पहावे त्या राज्य सरकारचा पूर्वानुभव अतिशय वाईट आहे. पावसाळ्याच्या प्रारंभी विदर्भात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले होते, त्या नुकसानापोटी ठाकरे सरकारने अवघ्या 18 कोटी रुपयांचा तुकडा विदर्भातील शेतकर्यांच्या तोंडावर फेकला. या असल्या तुटपुंज्या मदतीने काय साध्य होणार आहे? निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण प्रांताचा कणा मोडला. वादळग्रस्तांचा हातात पडलेली रक्कम पाहून हसावे की रडावे हे कळेनासे होते, अशी विदारक परिस्थिती आहे. विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी बारामतीपासूनच आपल्या तीन दिवसांच्या दौर्याची सुरुवात केली. राज्य सरकारचे प्रमुख मार्गदर्शक, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वत: नुकसानीची पाहणी करण्यासाठी रविवारीच मराठवाडा दौर्यावर रवाना झाले. इतके दिवस घरात बसून असलेले मुख्यमंत्री महोदय यांनाही नाईलाजाने दौरा करावाच लागला. याबरोबरच इतर अनेक नेत्यांनी शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी राज्याच्या विविध भागांत दौरे सुरू केले. विशेष म्हणजे राज्य सरकारचे नेते दिलासा देण्यापलिकडे शेतकर्यांचे काहीही भले करू शकत नाहीत हे तर सर्वांनाच चांगले ठाऊक आहे. शेतकर्यांच्या साह्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला सर्वतोपरि मदत करू, असे आश्वासन आधीच दिले आहे. महाराष्ट्राने हात पसरण्याच्या आधीच पंतप्रधानांनी स्वत: फोन करून मुख्यमंत्र्यांना हा दिलासा दिला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. विरोधी पक्षाचे राज्य असतानाही संकटकाळामध्ये कुठलेही राजकारण न आणता अहर्निश काम करणारा पंतप्रधान आपल्याला लाभला आहे हा एकमेव दिलासा आणि आधार महाराष्ट्राच्या शेतकर्यांसाठी उरला आहे. या प्रचंड संकटामध्ये पंतप्रधान मोदींकडे साह्य मागण्याची तयारी शरद पवार यांनी देखील दाखवली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीदेखील पंतप्रधानांच्या आश्वासनाकडेच डोळे लावून बसले आहेत, परंतु पंतप्रधान मदत करतीलच, तुम्ही काय करणार, असा रोकडा सवाल फडणवीस यांनी विचारला. त्याला मात्र बिघाडी सरकारकडे उत्तर नाही.
Check Also
खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …
RamPrahar – The Panvel Daily Paper