Breaking News

लेडिज स्पेशलचा मुहूर्त

नवरात्रीच्या शुभमुहुर्तावर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राज्य सरकारच्या सूचनेनुसार फक्त महिलांसाठी उपनगरी रेल्वेसेवा उपलब्ध करून दिली. त्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचे शतश: आभार मानायला हवेत. कारण राज्य सरकारने निर्णय घेतल्यास उपनगरीय रेल्वेसेवा सुरू करण्याची तयारी त्यांनी यापूर्वीच दर्शवली होती. परंतु याबाबत निर्णय घेण्यास अक्षम्य चालढकल करून राज्य सरकारने महिला वर्गाच्या सहनशीलतेचा अंत पाहिला. देर आए दुरुस्त आए या उक्तीनुसार अखेर महिलांसाठी रेल्वेसेवा उपलब्ध झाली आहे हेही नसे थोडके.प्रचंड आढेवेढे घेत अखेर ठाकरे सरकारने मुंबईतील उपनगरी रेल्वे महिलांसाठी सुरू केली आहे. त्याचे स्वागतच करायला हवे. अर्थात, लोकल प्रवास मुंबईकर महिलांसाठी खुला झाला असला तरी तो अंशत: म्हटला पाहिजे. या प्रवासात महिलांना क्युआर कोडची आवश्यकता भासणार नाही. साध्या तिकिटावर महिलांना लोकलचा प्रवास शक्य होणार आहे. गेले जवळपास दोन महिने भारतीय जनता पक्ष व अन्य विरोधी पक्ष लोकल रेल्वे सेवा सुरू करावी यासाठी आग्रह धरत होते. पश्चिम उपनगरी मार्गावरील वसई-विरार आणि मध्य उपनगरी मार्गावरील कर्जत-कसारा, डोंबिवली येथून नोकरी धंद्यासाठी मुंबई गाठणारे लाखो प्रवासी आहेत. या प्रवाशांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये जे काही हाल भोगले त्याची तुलना कशाशीच होऊ शकणार नाही. पनवेल आणि नवी मुंबई भागातून देखील हजारो चाकरमानी पोटापाण्यासाठी दररोज मुंबई गाठत असतात. परंतु त्यांच्या हालाकडे पाहून राज्य सरकारला पाझर फुटला नाही. आजही या लाखो चाकरमान्यांना रस्तामार्गे तासन्तास प्रवास करून आपल्या नोकरी-व्यवसायाचे ठिकाण गाठावे लागते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काळजी घ्या असे सांगणे योग्यच आहे. पण घरात बसून राहा या सल्ल्याला काहीही अर्थ नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आजारी पडावयाचे की भुकेने मरावयाचे अशा संभ्रमात हजारो पोटार्थ्यांनी लॉकडाऊनच्या काळात नरकयातना भोगल्या. अर्थात, महिलांसाठी लोकल रेल्वेचा प्रवास खुला झाला असला तरी तूर्तास तो तितकासा सोयीचा नाही याकडे देखील लक्ष वेधणे भाग आहे. सकाळी अकरा ते दुपारी तीन आणि सायंकाळी सात ते अखेरची लोकल या वेळेमध्ये महिलांना रेल्वे प्रवास करता येणार आहे. या वेळा चाकरमानी माताभगिनींसाठी किती गैरसोयीच्या आहेत हे वेगळे सांगावयाची गरज नाही. या वेळांमध्ये प्रवास करून मुंबईतील कुठले कार्यालय वेळेत गाठता येते हा प्रश्नच आहे. चाकरमानी माताभगिनींना रेल्वेचा खराखुरा लाभ मिळावा असे वाटत असेल तर सकाळी सात वाजल्यापासून महिला वर्गाला ती सवलत मिळायला हवी. सकाळी अकरानंतर कामाची वेळ गाठणे किती महिलांना शक्य होईल ही शंकाच आहे. खरे तर मुंबईचे अर्थचक्र रुळावर यायला हवे असेल तर महिलांप्रमाणेच पुरुषवर्गास देखील उपनगरी रेल्वेची दारे उघडण्यात यावीत. कारण डोंबिवली, ठाणे, दहिसर, बोरिवली, पनवेल, नवी मुंबई येथे बसगाड्यांसाठी तासन्तास रांगा लागलेल्या दिसून येतात. खेरीज ऑफिस गाठण्यासाठी चार-पाच तास प्रवास करावा लागतो. हे सगळे टाळावयाचे असल्यास उपनगरी रेल्वे सेवा सुरू करणे हा एकमेव उपाय आहे. तूर्त तरी नवरात्रीच्या निमित्ताने लेडिज स्पेशल लोकल गाड्या सुरू झाल्या याचे स्वागतच करुया.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply