Breaking News

मी हायवेवर पाहणी करून निघून गेलो नाही; संभाजीराजेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

पुणे : प्रतिनिधी

मी आठवडाभर गावांमध्ये पायी फिरलो. चिखलात चालत गेलो. ट्रॅक्टरवर बसून गेलो. माझे दौरे ग्राऊंडवर होते, पण मी हायवेवर पाहणी करून निघून गेलो असे दौरे केले नाहीत, अशा शब्दांत राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाहणी दौर्‍यावरून टोला लगावला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माध्यामांशी बोलताना खासदार संभाजीराजे म्हणाले, मराठवाड्यातील शेतकर्‍यांच्या वेदना समजून घेण्यासाठी मी दौरा केला आहे. तेथील परिस्थिती भयानक झाली आहे. शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेतल्या असता, हेक्टरी 50 हजार रुपये मदत राज्य सरकारने दिली पाहिजे. आपला पोशिंदा संकटात आहे. तो जगला पाहिजे. त्याला तत्काळ मदत झाली पाहिजे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्य मंत्रिमंडळात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि त्यानंतर केंद्राकडे निधी मागवा; अन्यथा सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथील महापूर आला होता. तेथील नुकसानभरपाईचा अहवाल केंद्राकडे गेला नाही. त्यामुळे केंद्राने त्या वेळी मदत जाहीर करूनदेखील केवळ राज्य सरकारने अहवाल पाठवला नाही. त्यामुळे अद्यापपर्यंत नुकसानभरपाई मिळाली नाही. अशी चूक या वेळी होता कामा नये. त्या दृष्टीने राज्य सरकारने पावले उचलण्याची गरज आहे. कोरोनामुळे आपली तिजोरी रिकामी झाली हे मान्य आहे, पण आपला पोशिंदा जगला पाहिजे यासाठी प्राधान्य द्यायला हवे. शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्याची लवकरच भेट घेणार असल्याचेदेखील संभाजीराजे यांनी सांगितले.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply