Breaking News

शाळेच्या कामात राजकीय रंग नको -आमदार महेश बालदी

उरण : वार्ताहर

शाळा हा विषय राजकीय असूच शकत नाही. शाळा हे विद्येचे मंदिर असून त्यासाठी नवघर ग्रामस्थ मंडळ पुढाकार घेऊन शाळा नवीन बांधण्यास तयार असताना फक्त राजकीय आकसापोटी व स्वत:चा नाकर्तेपणा झाकण्याकरिताच ते परवानगी नाकारत आहेत हि बाब दुर्देवी आहे. शाळेच्या कामात राजकीय रंग नको, असे मत आमदार महेश बालदी  यांनी नवघर ग्रामस्थांनी नवघर ग्रामपंचायत विरोधात केलेल्या उपोषणाच्या सांगताच्या वेळी केले.

 ते पुढे  म्हणाले, शाळा स्वतः बांधायची नाही. दुसर्‍याला बांधून द्यायची नाही. जरी नवघर ग्रामपंचायतीने शाळा बांधायला परवानगी नाकारली तरी जिल्हा परिषद शिक्षण विभाग व संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून नवघर शाळेची नवीन इमारत बांधण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करेन, असे नवघर ग्रामस्थ मंडळाच्या उपोषणास पाठिंबा देताना आमदार बालदी यांनी सांगितले.

नवघर शाळेची दुरवस्था झालेली असल्याने शाळेची नवीन इमारत बांधण्याकरिता नवघर ग्रामस्थ तयार असताना नवघर ग्रामपंचायत परवानगी नाकारत आहेत. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. 22) नवघर ग्रामपंचायतविरोधात नवघर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. सायंकाळी उरणचे आमदार महेश बालदी यांनी उपोषणकर्त्यांना नारळपाणी पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली.

या वेळी भाजप तालुका अध्यक्ष रवी भोईर, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, नगरसेवक राजेश ठाकूर, सुधीर घरत, जयप्रकाश पाटील, योगेश तांडेल, धर्मेंद्र तांडेल, वैभव भोईर, नवघर ग्रामपंचायत सदस्य मयुरी पाटील, दमयंती पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply