कर्जत भाजप युवा मोर्चाची मागणी
कडाव : प्रतिनिधी
लॉकडाऊनमध्ये बंद केलेली कर्जत-सांडसी बससेवा लवकरात लवकर सुरू करा, अशी मागणी भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी आगार व्यवस्थापकांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर रेल्वेसेवा, बससेवा, शाळा आदी यंत्रणा बंद करण्यात आल्या होत्या. अनेक महिन्याच्या प्रतिक्षेनंतर परिस्थिती पूर्ववत होऊ लागल्याने बससेवेसह रेल्वेही रुळावर आली आहे. राज्य परिवहन महामंडळाने बससेवा सुरु करण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार कर्जत आगारातून पनवेल, पाली, मुरबाड या गाड्यांच्या फेर्या सुरू झाल्या आहेत. मात्र ग्रामीण भागातील एसटी अजूनही बंदच आहे. कर्जत-सांडशी दरम्यानच्या अनेकांना नोकरी, धंद्या निमित्ताने शहरांच्या ठिकाणी नित्यनेमाने जावे लागत आहे. मात्र एसटी बससेवा बंद असल्याने या परिसरातील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील यांनी एसटी महामंडळाच्या कर्जत आगार व्यवस्थापकांची भेट घेऊन, त्यांना कर्जत-सांडशी बससेवा पुर्ववत सुरू करण्याबाबत निवेदन दिले. या वेळी युवामोर्चाचे पदाधिकारी योगेश घारे, नवीन देशमुख आदी उपस्थित होते.