नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – आंब्यांचा हंगाम सुरू होण्यास अवकाश असला तरी वाशीच्या घाऊक फळबाजारात स्पेनचा आंबा दाखल झाला आहे. दसर्याच्या मुहूर्तावर आलेल्या या आंब्याची बाजारात सध्या चर्चा आहे. हा आंबा आपल्याकडील तोतापुरी आंब्यासारखा दिसत असून त्याचा भाव मात्र अवाजवी म्हणजे प्रतिपेटी 3,600 ते 4 हजार रुपये आहे. त्यामुळे या आंब्याला बाजारात हवी तशी मागणी दिसत नाही.
मुंबई घाऊक बाजारात देशाच्या कानाकोपर्यातून आणि विदेशातील ठरावीक ठिकाणांहून आंब्यांची आवक होत असते. आंब्यांसाठी वाशी मार्केट ही देशातील सर्वांत मोठी बाजारपेठ मानली जाते. त्यामुळे सर्व ठिकाणचा आंबा या बाजारात येतो आणी त्याला चांगला उठावही मिळतो.
घाऊक फळबाजारात वर्षभर विविध प्रकारच्या आंब्यांची, कैर्यांची आवक होत असते. मात्र ती कमीजास्त प्रमाणात असते. सध्या आंब्याचा हंगाम नाही. मात्र विदेशातील हवामान भिन्न असल्याने या बाजारात सध्या स्पेनचा आंबा दाखल झाला आहे. स्पेनच्या आंब्याच्या 50 पेट्या आल्या असून या प्रत्येक पेटीत 50 आंबे आहेत. या एका पेटीची किंमत 3,600 ते 4 हजार रुपये असल्याने ग्राहकांनी अद्याप त्यात स्वारस्य दाखवलेले नाही.