पनवेल : वार्ताहर – पतीच्या विवाहबाह्य संबंधाबाबत समजल्यावर पतीकडून होणार्या शारीरिक व मानसिक छळाला वैतागलेल्या या विवाहितेने विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याची घटना पनवेलच्या कुंडेवहाळ गावात घडली आहे.
या प्रकारानंतर पनवेल शहर पोलिसांनी मृत विवाहितेच्या पती विरोधात छळवणुकीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील मृत विवाहितेचे नाव योगिता कातकरी (25) असे असून, ती पनवेलच्या कुंडेवहाळ येथील खालची कातकरी वाडीत राहण्यास होती. 2010 मध्ये तिचा विवाह गावातीलच अभिमन्यू कातकरी (28) याच्यासोबत त्यांना दोन मुले देखील झाली. अभिमन्यू याचे मागील तीन-चार वर्षापासून एका महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते. याबाबत योगिता आणि तिच्या कुटुंबियांना देखील माहिती होती. त्यामुळे अभिमन्यू आणि योगिताच्या कुटुंबियांमध्ये वारंवार भांडणे होऊन अभिमन्यू योगिताला सतत मारहाण करुन घराबाहेर काढत होता. याबाबत योगिताच्या कुटुंबियांनी कुंडेवहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच यांच्याकडे देखील तक्रार केली होती. अभिमन्यू याने योगिताला मारहाण केली होती. त्यामुळे योगिताने विषारी द्रव्य प्राशन केल्याने तिला कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान योगिताचा मृत्यू झाला. यानंतर योगिताचा भाऊ योगेश कातकरी याने पनवेल शहर पोलीस ठाण्यात अभिमन्यूविरोधात तक्रार दाखल केली.