Thursday , March 23 2023
Breaking News

‘ती’ भुयारे पेशवेकालीन नसून ब्रिटिशकालीन ः पुरातत्त्व विभाग

पुणे ः प्रतिनिधी : पुण्यातील स्वारगेट परिसरात मेट्रोच्या मल्टी मोडल हबचे काम सुरू असताना आढळून आलेली दोन भुयारे ही पेशवेकालीन नसून ब्रिटिशकालीन असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांनी याबाबत माहिती दिली. या भुयारांच्या बांधकामाच्या पद्धतीवरून ती ब्रिटिशांनी बांधली असावीत, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

स्वारगेट येथील सातारा रोडकडे जाणार्‍या राजर्षी शाहू महाराज पीएमपी डेपोजवळ मेट्रोच्या मल्टी मोडल हबचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी पायलिंग मशीनद्वारे येथे खोदकाम सुरू असून हे काम सुरू असताना तीन दिवसांपूर्वी अचानक जमीन खचली आणि खाली मोठा खड्डा पडला. दरम्यान, मेट्रोच्या कर्मचार्‍यांनी त्या खड्ड्यामध्ये जाऊन पाहणी केली असता खड्ड्यात दोन भुयारे असल्याचे आढळून आले. ही भुयारे तीन दिशांना वळविण्यात आली असून या भुयारापासून 35 ते 40 मीटर अंतरावरून मुठा उजवा कालवा वाहतो. ज्या ठिकाणी हे भुयार आढळून आले आहे, त्या भुयाराची लांबी 55 मीटर आहे. यातील एका भुयाराची बाजू सारसबागेपासून पर्वती दिशेने, तर दुसरी बाजू पूर्व दिशेला गुलटेकडीच्या बाजूला वळविण्यात आली आहे. या भुयाराची उंची साधारण 12 फूट असून याचे सिमेंटच्या साहाय्याने पक्के बांधकाम झाले आहे. दरम्यान, मागील तीन दिवसांपासून हे भुयार पेशवेकालीन असल्याची चर्चा शहरात सुरू होती, मात्र याची पडताळणी करण्यासाठी गेलेल्या पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍यांनी हे पेशवेकालीन नसल्याचा निर्वाळा दिला आहे.

याबाबत पुराायत्त्व विभागाचे साहाय्यक संचालक विलास सहाणे म्हणाले की, स्वारगेटजवळ भुयार असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी जाऊन आमच्या पथकाने पाहणी केली. त्याचे व्यवस्थित निरीक्षण केल्यानंतर या भुयाराचे बांधकाम विटा आणि सिमेंटच्या साहाय्याने केल्याचे दिसत आहे. आतमधील पाइपलाइननुसार ब्रिटिश काळातील हे भुयार असावे, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. या भुयारांची माहिती घेऊन महामेट्रोला सविस्तर अहवाल दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply