तळोजा येथे सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक विभागाचा उपक्रम
पनवेल ः बातमीदार : संपूर्ण देशातील सर्वेक्षणानुसार झालेल्या अपघातात तब्बल 33 हजार मयत हे दुचाकी अपघातामध्ये झाले आहेत आणि त्यातही तरुणांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर असून, केवळ हेल्मेट न घातल्याने त्यांचा जागीच अंत झाला आहे. शनिवारी तळोजा वाहतूक विभागाच्या वतीने हेल्मेट वापरण्याचे फायदे आणि जनजागृतीबाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या वेळी नागरिकांमध्ये हेल्मेटची जनजागृती करण्याकरिता हेल्मेट विथ कॅम्पस या कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते.
या वेळी तळोजा पोलीस ठाण्याचे वपोनि. अजयकुमार लांडगे, तळोजा वाहतूक शाखेचे वपोनि. राजेंद्र आव्हाड, कळंबोली वाहतूक शाखेचे वपोनि. अंकुश खेडकर, तळोजा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक
देशमुख, पावरिका लिमिटेड कंपनीचे एचआर हेड मालंडकर, व्हिनस सेफ्टी अँड हेल्थ प्रा. लि. कंपनीचे व्हाइस प्रेसिडंट रमण, व्यवस्थापकीय संचालक महेश कुडव यांच्यासह दोन्ही कंपन्यांचे जवळपास 350 ते 400 कर्मचारी कार्यक्रमासाठी उपस्थित होते, तसेच दुपारच्या सत्रात व्हिनस सेफ्टी अँड हेल्थ प्रा. लि. कंपनीच्या गेटवर हेल्मेट सक्तीचे हेल्मेट विथ कॅम्पस अशा आशयाचे फलक लावण्यात आले. या वेळी व्हिनस सेफ्टी हेल्थच्या कार्यक्रमावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
या वेळी वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळले पाहिजे. कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांना जागा देऊ नका. वाहतुकीचे नियमन केले तर कारवाई होणार नाही. हेल्मेटचा वापर करून आपला जीव वाचवा आणि घरच्या मंडळींना होणार्या मनस्तापापासून दूर ठेवा, असे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने उपस्थित सर्व नागरिकांना करण्यात आले.
या वेळी प्रमुख उपस्थिती लाभलेले वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण पाटील तसेच राजेंद्र चव्हाण यांनी आपला जीव वाचविण्यासाठी हेल्मेट गरजेचे असल्याचे पटवून दिले. या वेळी दोन्ही कंपन्यांचे मिळून जवळपास 350 ते 400 कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते, तसेच या वेळी तळोजा औद्योगिक वसाहतीमधील इतर
कंपन्यांमध्येही अशा प्रकारे हेल्मेट विथ कॅम्पस अशा आशयाचे फलक कार्यक्रमाच्या माध्यमातून लावण्यात येणार असल्याची माहितीही तळोजा वाहतूक शाखेचे राजेंद्र आव्हाड यांनी दिली.