Breaking News

मुंबईचा दिल्लीवर दणदणीत विजय

मुंबई : रामप्रहर वृत्त

सलामीवीर इशान किशनचं अर्धशतक आणि त्याला क्विंटन डी-कॉक व सूर्यकुमार यादव यांनी दिलेली भक्कम साथ या जोरावर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर 9 गडी राखून विजय मिळवला आहे. प्ले-ऑफचं तिकीट मिळवलेल्या मुंबईने दिल्लीवर मात करत इतर संघांसाठीची शर्यत अधिक रंगतदार केली आहे. 111 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सने आपल्या डावाची धडाकेबाज सुरुवात केली. किशन आणि डी-कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. सलामीची जोडी मुंबईला विजय मिळवून देणार असं वाटत असताना डी-कॉक बाद झाला. परंतू यानंतर इशानने सूर्यकुमारच्या साथीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेत इशान किशनने नाबाद 72 धावांची खेळी केली. आपल्या अर्धशतकी खेळीत किशनने 8 चौकार आणि 3 षटकार लगावले.

त्याआधी कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कायरन पोलार्डच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या मुंबई इंडियन्स संघाने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ सुरु ठेवला .प्ले-ऑफचं तिकीट मिळवल्यानंतरही दुबईच्या मैदानावर दिल्लीविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत दिल्लीला 110 धावांवर रोखलं आहे. दिल्लीचा एकही फलंदाज आज मुंबईच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. नाणेफेक जिंकत मुंबईचा कर्णधार कायरन पोलार्डने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्पर्धेत आपलं आव्हान कायम राखण्यासाठी दिल्लीच्या संघाला विजयाची आवश्यकता होती. परंतू मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक मार्‍यासमोर पहिल्या षटकापासून दिल्लीच्या फलंदाजांनी मान टाकायला सुरुवात केली. सलामीवीर शिखर धवन सलग दुसर्‍या सामन्यात शून्यावर बाद झाला. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर सूर्यकुमारने धवनचा झेल घेतला. यानंतर अजिंक्य रहाणेच्या जागेवर संधी मिळालेल्या पृथ्वी शॉ देखील अपयशी ठरला, बोल्टच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात पृथ्वी 10 धावा काढून बाद झाला.

कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी तिसर्‍या विकेटसाठी 35 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दिल्लीची ही जोडी फोडण्यासाठी कर्णधार पोलार्डने राहुल चहरला संधी दिली. चहरनेही आपल्या लेगस्पिनच्या जाळ्यात दिल्लीच्या कर्णधाराला अडकवत संघाला मोठं यश मिळवून दिलं. यानंतर दिल्लीच्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. बुमराह, चहर, बोल्ट, कुल्टर-नाईल यांनी एकामागोमाग एक दिल्लीला धक्के देणं सुरु ठेवलं. स्टॉयनिस, ऋषभ पंत, हर्षल पटेल, शेमरॉन हेटमायर यांनीही फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात आपल्या विकेट फेकल्या. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी 3-3 तर कुल्टर-नाईल आणि चहर यांनी 1-1 बळी घेतला.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply