Breaking News

‘आरडीसीए’ला मिळणार हक्काचे मैदान!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे शिष्टमंडळाला आश्वासन

अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनला (आरडीसीए) राज्य शासनाच्या वतीने मैदानासाठी दीर्घ मुदतीकरिता जागा मिळावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मंगळवारी (दि. 29) आरडीसीएच्या पदाधिकार्‍यांसह राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. मंत्रीमहोदयांनी ही मागणी मान्य करीत या संबंधी कार्यवाही करण्याचे निर्देश रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत.
आरडीसीएला स्वतःचे मैदान नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणार्‍या विविध वयोगटातील मुला-मुलींच्या क्रिकेट स्पर्धा, सराव शिबिरे यासाठी जिल्ह्यातील विविध कंपन्यांकडील किंवा खासगी क्लबकडील मैदानांवर अवलंबून रहावे लागते व त्याची उपलब्धता ही काही मर्यादित दिवसांसाठी होते. या पार्श्वभूमीवर आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सहकार्‍यांनी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची नुकतीच भेट घेत या विषयाकडे लक्ष वेधले होते. त्यानुसार आमदारांनी या संदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांना आरसीडीएच्या वतीने प्रस्ताव देऊ, असे सांगितले होते. त्यानुसार शनिवारी ही भेट झाली.
या भेटीवेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्यासह आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, उपाध्यक्ष यशवंत साबळे, सदस्य शंकर दळवी, प्रदीप खलाटे, विनय पाटील आदी उपस्थित होते.
या वेळी शिष्टमंडळाने, आरडीसीएला स्वतःच्या हक्काचे मैदान मिळाल्यास जिल्ह्यातील होतकरू खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देता येणार आहे. क्रीडांगणासाठी दीर्घकालीन करारावर जागा उपलब्ध करून दिल्यास निधी उपलब्ध होईल, असे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए)कडून लिखित स्वरूपाचे पत्र दिले आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासकीय जागा दीर्घकालीन कराराच्या योजनेत वापरण्यासाठी द्यावी, असा प्रस्ताव मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिला. त्यावर मंत्री बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि जिल्हाधिकार्‍यांनी जागेचा शोध घेऊन प्रस्ताव शासनाला सादर करावा, असे निर्देश दिले आहेत.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply