पेण : प्रतिनिधी
कोरोनाच्या संकटाला दूर सारत नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थी सज्ज झाले आहेत. बुधवारी सुरु झालेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. पेण एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका लेखा ठाकूर, शिक्षिका अपर्णा वाघमारे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सचिन म्हात्रे आदींनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मुलांच्या चेहर्यावर आनंद दिसून येत होता. या वेळी शिक्षिका सुषमा साखरे, कविता पेडणेकर, शिक्षक धनाजी घरत, मिलिंद वारगुडे, गीता म्हात्रे, रुपाली पाटील, ऋचा परांजपे, अश्विनी पाटील, कमला पाटील, प्रतीक्षा म्हात्रे, तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सचिन म्हात्रे, विद्या पाटील, राजेश धारशे, हिराचंद पाटील आदी उपस्थित होते. या वेळी लेझीम पथकाच्या तालात तसेच विद्यार्थ्यांचे औक्षण करत व पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. नवीन मित्र-मैत्रिणी, नवीन पाठ्यपुस्तके, बदललेली शाळा, शिक्षकांचे बदललेली चेहरे बघण्यासाठी मुला, मुलींना उत्सुकता लागली होती. शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी बुधवारपासून पुनश्च एकदा हसू खेळू बागडू लागले आहेत. दरम्यान, शाळा सुरु झाल्याने पालक, शिक्षणप्रेमी समाधानी दिसत आहेत.
शाळेचे दिवस परत आल्याने मुरूडमधील विद्यार्थ्यांमध्ये उत्साह
मुरुड : कोरोनाकाळानंतर शाळा सुरु झाल्यामुळे मुरुडमध्ये विद्यार्थी आणि मुलांमध्ये उत्साह दिसून आला. बर्याच कालावधीनंतर विद्यार्थी शाळेत पुन्हा आले. ते शाळेत आनंदाने यावेत तसेच शाळेत मुलांची संख्या वाढावी म्हणून मुलांचे फुले देऊन स्वागत करा. त्यांना शाळेत दप्तराचे ओझे होऊ नये म्हणून शाळेत पुस्तके उपलब्ध करण्याचे आदेश शासनस्तरावरुन देण्यात आले होते. त्याप्रमाणे आज शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत झाले. दरम्यान, कोरोना काळात दीड वर्ष शाळा बंद होती. मुलांना जणू शाळेचा विसर पडला होता. शाळा म्हणजे नवीन कपडे, नवीन बूट, दप्तर, आणि नवीन छत्री अशा वस्तू विकत घेणे म्हणजे शाळा सुरु होणे असा मुलांचा समज असतो. कोरोना काळात हे सर्वच बंद झाले होते. घरात मोबाइलवरुन न समजणारा अभ्यास कसाबसा समजून घेण्याचा प्रयत्न करणारी मुले शाळा सुरु होणार हे समजताच खूप आनंदी झाली होती. शाळेचा पहिला दिवस आला अणि मुलांचे पाय शाळेकडे वळले. सर एस. ए. हायस्कूलमध्ये बालवाडीत सकाळी मुलांना पालक सोडायला आले होते. मुले आनंदाने वर्गात बसली. नवीन मित्र, नवीन शिक्षक, नवीन अभ्यास हे सारे आपल्या आयुष्यात परत आल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंद होता. शाळेत फक्त मुलांना शिक्षणच मिळत नाही तर गंमतीजमती मित्र-मैत्रिणीतील मजा-मस्ती अशा अनेक आनंदमय घटना असतात. शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण अजूनही काहींच्या मनात ताजी आहे. शाळेत जाताना मुलांच्या मनात अनेक विचार येत होते. त्यामध्ये आम्हाला नवीन वर्गशिक्षक कोण असतील नवीन वर्ग कसा असेल, वर्गात कोण नवीन मित्र मैत्रिणी येतील अशा अनेक विचारांनी मुले गोंधळली असतात. मात्र शिक्षक विद्यार्थ्यांना धीर देत होते.