मंडप डेकोरेटर्स, डिजे लाईट आणि फोटोग्राफर असोसिएशनची मागणी
अलिबाग : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यात केवळ 50 लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभांचे आयोजन करण्याची सक्ती राज्य सरकारने घातली आहे. त्यामुळे मंडप, डेकोरेटर्स आणि मंगलकार्य चालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. हि बाब लक्षात घेऊन आता 500 लोकांपर्यंत लग्न समारंभ आयोजन करण्यास शासनाने परवानगी द्यावी अथवा मंगलकार्याच्या एकुण आसन क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीला मान्यता द्यावी अशी मागणी रायगड जिल्हा मंडप डेकोरेटर्स, डिजे लाईट आणि फोटोग्राफर असोसिएशने केली आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची अलिबाग, रोहा आणि मुरुड येथील व्यवसायिकांनी भेट घेतली आणि आपले निवेदन सादर केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर मार्च महिन्यात देशभरात टाळेबंदी जाहीर करण्यात आली. त्यामुळे लग्न समारंभांच्या आयोजनावर निर्बंध आले होते. ऑगस्ट महिन्यापासून टाळेबंदी काही प्रमाणात शिथील झाली. मात्र राज्यात लग्नसमारंभ 50 लोकांच्या उपस्थितीत आयोजित करण्याचे निर्देश राज्यसरकारने दिले. त्यामुळे जवळपास गेले आठ महिने मंडप डेकोरेटर्स, डेजी आणि लाईट ऑपरेटर्स, फोटोग्राफर्स, कॅटरर्स आणि मंगलकार्य चालकांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. देशभरात अनलॉकची प्रक्रीया सुरु झाली असली तरी लग्नसमारंभांच्या आयोजनावरील निर्बंध कायम आहेत. आता हे निर्बंध उठविण्यात यावेत, किमान 500 लोक अथवा मंगलकार्याच्या एकुण क्षमतेच्या 50 टक्के लोकांच्या उपस्थितीत लग्नसमांरभाच्या आयोजनास मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे शासनाला करण्यात आली.
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी राज्यसरकारचे निर्देश आले, तर जास्त लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळ्यांच्या आयोजनास परवानगी दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी मंडप डेकोरेटर्स, कॅटरर्स, फोटोग्राफर्स आणि डिजे ऑपरेटर्स संघटनेच्या शिष्टमंडळाला दिली.