कर्जतमध्ये जवानांना श्रद्धांजली
कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी
भारतीय लष्करावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी कर्जतकर नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यांनी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्चदेखील काढला.
कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौकात हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करण्यासाठी थोरामोठ्यांपासून महिला आणि तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. स्थानिक लोकप्रतिनिधीही बहुसंख्येने सहभागी झाले होते. जनसमुदाय आणि त्यांनी कॅण्डल मार्चसाठी टिळक चौकात केलेली गर्दी आणि ती देखील निशब्द अशीच होती. कर्जत शहरातील बहुतेक सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी यांची या वेळी उपस्थिती होती. कॅण्डल मार्चच्या आधी शहिदांच्या छायाचित्रांना अभिवादन करण्यात आले.
दरम्यान, कर्जत येथील उपअभियंता गोरक्ष गवळी, ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष राहुल डाळींबकर, सचिव उदय पाटील यांनी या दहशतवादी हल्ल्याची निर्भत्सना करून, शाहिद जवानांच्या कुटुंबियाला न्याय मिळावा, या करिता सरकारने सर्वतोपरी प्रयत्न करावा आणि या हल्यामागे असणार्यांना कायमची अद्दल शिकवावी, असे सांगितले.
या वेळी कनिष्ठ अभियंता धनाजी टिळे, प्रशांत राखाडे, ठेकेदार शरद बडेकर, जितू जोशी, मोहन देशमुख यांच्यासह कार्यालयीन कर्मचार्यांनी दोन मिनिटे शांत उभे राहून शहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली.
पालीत शहिदांना आदरांजली
पाली : प्रतिनिधी
जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा शुक्रवारी (15 फेब्रुवारी) सुधागड पालीत सामाजिक संघटनांकडून जाहीर निषेध करण्यात आला. तसेच या हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
शुक्रवारी सकाळी पालीतील हटाळेश्वर चौक येथून निषेध रॅली काढण्यात आली. पुढे पाली बाजारपेठ, गांधी चौक ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन दहशतवादी हल्ल्याच्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी भारत माता की जय, जय जवान जय किसान, शहिद जवान अमर रहे अमर रहे अशा घोषणांनी परिसर दणाणून
गेला होता.
निवृत्त सैनिक प्रसाद लखिमळे, सत्यशोधक वारकरी सांप्रदायाचे जिल्हाध्यक्ष हभप महेश पोंगडे महाराज, सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रविणकुमार पाटील, मुस्लीम वेल्फेअर सामाजिक संघटनेचे सुधागड तालुकाध्यक्ष बशिरभाई परबळकर, ध्येय सामाजिक संघटनेचे अध्यक्ष शरद गोळे, महापरिवर्तनवादी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष धम्मशिल सावंत, प्रा. संतोष भोईर, जागृती अपंग कल्याणकारी संस्थेचे उपाध्यक्ष रमेश मुल्ल्या, किरण भगत, गणेश कदम, सुलतान पठाण, अहमद शेख, मंगेश घावटे, गोपाळ कदम, फिरोज पठाण, सर्पमित्र नरेश मोहिते, भिखु डोके, उमेश पातेरे, महेंद्र भगत, संतोष भरुड, निलेश लहाने, लतिक कबले, फरोज पठाण, कोतवाल (मामा) सुतार, शंकर पालांडे, बल्लेश सावंत आदींसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व नागरिक निषेध रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा मानवतेला काळीमा फासणारा आहे. अशावेळी सर्व भारतीयांनी सैनिकांच्या पाठीश खंबिरपणे उभे राहिले पाहिजे, असे मत निवृत सैनिक प्रसाद लखिमळे यांनी या वेळी व्यक्त केले.
दहशतवाद्यांच्या हल्ल्याला जशास तसे उत्तर देवून बदला घेतला पाहिजे. केवळ सर्जीकल स्ट्राईक न करता दहशवाद्यांना मुळापासून उखडून टाकण्याची वेळ आली असल्याचे प्रा. संतोष भोईर यांनी सांगितले. या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविणकुमार पाटील, हभप महेश पोंगडे महाराज, शरद गोळे, बशिरभाई परबळकर आदींनी दहशवाद्यांच्या हल्ल्याबाबत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.
खोपोलीत पाकिस्तानचा निषेध
खालापूर : प्रतिनिधी
काश्मिरात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना खोपोलीत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर तसेच शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली वाहिली. या वेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत त्यांनी दहशतवादी हल्ल्याचा
निषेध केला.
खोपोलीच्या समाज मंदिर मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पाटील, शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रिया जाधव, डॉ. कटकदौंड, युवासेनेचे तालुकाधिकारी महेश पाटील, खोपोली उप शहर अधिकारी इरफान खान, महिला आघाडीच्या अनिता पाटील, रश्मी आंग्रे, भाजपच्या सौ. मेहंदळे, सौ. जाखोटीया यांच्यासह भाजप-शिवसेना कार्यकर्ते आणि नागरिक या वेळी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
महाड शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
महाड : प्रतिनिधी
पुलवामा येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी महाडमधील सर्व नागरिक रस्त्यावर आले. शहरातील व्यापार्यांनी आपली दुकाने बंद ठेवून निषेध रॅलीत सहभाग घेतला. शहरातील शिवाजी चौक येथे पाकिस्तानचा प्रतिकात्मक पुतळादेखील जाळला.
महाडमधील प्रमुख संघटना एकत्रित येत पुलवामा हल्ल्याचा निषेध करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅली काढण्यात आली होती. ही निषेध रॅली चवदारतळे, गांधारी नाका, साळीवाड नाका, जुनी पेठ, नवेनगर, प्रांत कार्यालय, ते छत्रपती शिवाजी चौक अशी काढण्यात आली. पाकिस्तान विरोधी घोषणा देण्यात आल्या. शहर व परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते. या वेळी आमदार भरत गोगावले यांनी शहीद सैनिकांच्या प्रती आदरांजली अर्पण केली.
अलिबागेत निषेध रॅली व बंद
अलिबाग : प्रतिनिधी
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी (16 फेब्रुवारी) रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. तसेच बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. या निषेध रॅल्यांना नागरिकांनी उत्फूर्त पाठींबा दिला. अलिबागमध्ये एक्स एनसीसी कॅडेड असोसिएशनच्या वतीने निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडाभुवनपासून सकाळी दहा वाजता सुरु झालेल्या या रॅलीला अलिबागकरांनी मोठा प्रतिसाद दिला. शहरातील नागरिक, व्यापारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले.
पाकिस्तानविरोधी घोषणा देत रॅली मारुती नाका, बालाजी नाका, ठिकरूळ नाका, शेतकरी भवन, आंबेडकर चौक, महावीर चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ दाखल झाली. शिष्टमंडळाच्या वतीने या वेळी जिल्हा प्रशासनाला एक निवेदन सादर करण्यात आले.
दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणार्यांवर कठोर कारवाईची मागणी या वेळी करण्यात आली. अलिबाग शहरातील व्यापारी असोसिएशनने सकाळी कडकडीत बंद पाळला.
शिवसेनेतर्फे पेणमध्ये पाकिस्तानचे प्रतिकात्मक दहन
पेण : प्रतिनिधी
पुलवामा येथील सीआरपीएफ जवानांवरील आत्मघातकी हल्ल्याचा पेणमध्ये शिवसेनेतर्फे जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी शहरातील शिवसेना कार्यालय ते कोतवाल चौकापर्यंत रॅली काढून पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान अशा घोषणा देत पाकिस्तानचा निषेध
करण्यात आला.
रॅलीमध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड, तालुका प्रमुख अविनाश म्हात्रे, शहरप्रमुख ओमकार दानवे, युवासेना उपजिल्हाधिकारी आशिष वर्तक, तालुका अधिकारी चेतन मोकल, तुकाराम म्हात्रे, हिराजी चौगुले, राजाराम पाटील, प्रसाद देशमुख, गणेश पाटील, श्रीतेज कदम, नरेश सोनावणे, सुरेश कोळी, गीता म्हात्रे, कल्पना पाटील, वंदना पाशिलकर, दिप्ती पाटील, जय पाटील, विशाल दोषी, लकी बोहरा, लंवेद्र मोकल, शब्बीर मुजावर, अर्षद कच्छी, शोहेब मुजावर, साजिद मुजावर, प्रशांत पाटील आदींसह शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
केंद्र सरकारने पाकिस्तानला त्याच पद्धतीने उत्तर देऊन अशा दहशतवादाचा बिमोड करण्याची गरज आहे. आता चर्चा नको तर कृती हवी, असे नरेश गावंड यांनी या वेळी सांगितले. तर पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घ्यायलाच हवा, त्याशिवाय गप्प बसू नये, असे सांगून अविनाश म्हात्रे यांनी पाकिस्तानचा जाहीर निषेध केला. या वेळी पाकिस्तानच्या प्रतिकात्मक झेंड्याला तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रतिमेला चप्पला मारून त्यांचे दहन करण्यात आले.
माथेरान बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
कर्जत : बातमीदार
सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी माथेरानमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी शहरातून कॅन्डल मार्च काढुन शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी भारतमातेचा जयजयकार करतानाच पाकीस्तान विरोधी संताप व्यक्त करण्यात आला.
माथेरानमध्ये शनिवारी सकाळपासून पर्यटकांची वर्दळ होती. मात्र पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेला दहशतवादी हल्ला लक्षात घेता येथील कामगार, अश्वपालक, रिक्षा चालक, तसेच सर्व व्यापार्यांनी आपले दैनदिन व्यवहार बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदविला. या बंदमध्ये येथील नगरपालिका शाळा आणि सरस्वती विद्या मंदिरमधील विद्यार्थ्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग दर्शवित शहरात कँडल मार्च काढला, त्यात माथेरानकर नागरिकही सहभागी झाले होते.
दरम्यान, एका हॉटेल व्यवसायिकाने आपले रेस्टॉरंट उघडे ठेवून या बंदला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांनी गांधीगीरी करीत पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय अशा घोषणा देऊन रेस्टॉरंट बंद करण्याचे आवाहन केले. या वेळी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. त्यानंतर महसूल अधीक्षकांच्या कार्यालयात जाऊन दहशतवादी हल्ल्याचे निषेध करणारे निवेदन देण्यात आले.
माथेरानमधील श्रीराम चौकात झालेल्या शोकसभेत अनेकांनी परखड भाषेत आपले म्हणणे मांडून पाकिस्तानचा निषेध केला. नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी नगरसेवक प्रदीप घावरे, कुलदिप जाधव, व्यापारी प्रमोद नायक, अश्वपाल संघटनेच्या आशा कदम, प्रकाश सुतार, योगेश जाधव, नगरसेवक वर्षा रॉड्रीक्स, शकील पटेल यांच्यासह व्यापारी, अश्वपालक, रिक्षा चालक आणि महिला तसेच पर्यटक तसेच बहुसंख्य नागरिक या वेळी उपस्थित होते.
रोह्यात पुतळा जाळून पाकिस्तानचा निषेध
रोहे ः प्रतिनिधी
पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर गुरूवारी करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा रोहा शहरातील राम मारूती चौकात शुक्रवारी (15 फेब्रुवारी) सायंकाळी दहशतवाद्याचा प्रतिकात्मक पुतळा व पाकीस्तानचा झेंडा जाळुन शिवसैनिकांनी निषेध नोंदवला. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, पाकीस्तान चोर है, यासह अन्य घेाषणा देण्यात आल्या.
दहशतवादी व पाकीस्तानचा निषेध नोंदविण्यासाठी रोह्यातील राम मारूती चौकात शुक्रवारी सायंकाळी शहरासह तालुक्यातील शिवसैनिक जमले होते. त्यांनी दहशतवाद्याचा प्रतिकात्मक पुतळ्याला चप्पला मारून निषेध नोंदवला. तालुका प्रमुख समिर शेडगे, शहर प्रमुख दिपक तेंडुलकर, महिला तालुका संघटक निता हजारे, नगरसेविका समिक्षा बामणे, उस्मान रोहेकर, उपतालुका प्रमुख महादेव साळवी, सचिन फुलारे, नितीन वारंगे, अनिष शिंदे, यतीन धुमाळ, राजेश काफरे यांच्यासह शहरातील व तालुक्यातील शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. या वेळी पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला. पाकिस्तानविरोधात घोषणा दिल्या.
कळंबमध्ये ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा
कर्जत : बातमीदार
पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर करण्यात आलेल्या अतिरेकी हल्ल्यात देशाचे जवान शहीद झाले. या घटनेचा कर्जत तालुक्यातील कळंब येथे शनिवारी कडकडीत बंद पाळून निषेेध करण्यात आला. तसेच गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. या वेळी मुस्लिम समाजातील कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात
उपस्थित होते.
आणि सामान्य नागरिक उपस्थित होते.
कळंब परिसरातील हिंदू -मुस्लिम बांधवांनी एकोप्याचे दर्शन घडवत शनिवारी बाजारपेठ बंद ठेवून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. कर्जत-मुरबाड मार्गावरील कळंब नाक्यावर पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही केले. या वेळी वीरमरण आलेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करून हल्ल्याचा निषेध केला. या वेळी सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, व्यापारी