अलिबाग : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचार्यांना दोन महिने वेतन मिळाले नाही. एका कर्मचार्याने आत्महत्या केली. याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने अलिबाग एसटी आगारात आंदोलन केले. या वेळी भाजपा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, अलिबाग तालुका सरचिटणीस प्रदीप पुनकर, निलेश महाडिक, सुनिल दामले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपतर्फे अलिबाग एसटी आगार व्यवस्थपकांना निवेदन देण्यात आले. मनोज चौधरी या कर्मचारी यांनी आत्महत्या केली असून या आत्महत्येस महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचे सुसाइड नोटमध्ये नमूद केले आहे. ठाकरे सरकार कंगना आणि अर्णव गोस्वामी यांच्या प्रकरणामध्ये व्यस्त असून त्यांना महाराष्ट्र परिवहन मंडलाच्या समस्यांकडे लक्ष देण्यास वेळ नाही आहे. एसटी कर्मचारी यांनी कोरोना काळात मोलाची भूमिका बजावली आहे. यामध्ये आठ कर्मचार्यांना कोरोनाची लागण होऊन त्यांचे मृत्यू झाले. अद्यापपर्यंत त्यांच्या परिवाराला न्याय मिळाला नाही. राज्य महामार्ग परिवहन सेवेतील कर्मचारी यांची सध्या परवड सुरु आहे. हे सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना अनेक आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून काही महिन्यांचे आंशिक वेतन त्यांना प्राप्त झाले. जुनचे तर वेतनच प्राप्त झालेले नाही. यांचे कुटुंबीय सध्या अतिशय अस्थिर मानसिकतेत जीवन जगत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.