Breaking News

रायगडात मंगळवारी जनआशीर्वाद यात्रेचा झंझावात

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सोमवारी प्रारंभ झाला असून या अंतर्गत केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा मंगळवारी (दि. 17) रायगड जिल्हा दौरा आहे. ते जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून अभिवादन, केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांतील लाभार्थींशी संवाद, वरिष्ठ नागरिकांशी भेट, मच्छीमार, व्यापारी, गोदाम व्यावसायिक व शेतकर्‍यांबरोबर संवाद, कोविड रुग्णालयाला भेट, गणेश मूर्तिकारांबरोबर बैठक, भूमिपुत्रांशी संवाद, आंदोलनातील व्यक्ती व परिवाराचा सत्कार करणार आहेत.
रायगड जिल्ह्यातील जनआशीर्वाद यात्रेला अलिबाग येथून सकाळी 8.30 वाजता प्रारंभ होणार असून पेण, पनवेल असे मार्गक्रमण करून उरण तालुक्यातील जासई येथे रायगड जिल्ह्यातील यात्रेचा समारोप होणार आहे. या जनआशीर्वाद यात्रेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, रायगडचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार किसन कथोरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार महेश बालदी, आमदार रमेश पाटील, आमदार रविशेठ पाटील, आमदार नितेश राणे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, पेण नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांच्यासह ज्येष्ठ नेते, जिल्हास्तरीय व स्थानिक पातळीवरील नेते तसेच लोकप्रतिनिधी यांचा सहभाग असणार आहे.
जनआशीर्वाद यात्रेला मंगळवारी अलिबाग येथून सुरुवात होणार आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री कपिल पाटील सर्वप्रथम सकाळी 8.30 वाजता कोविड रुग्णालयाला भेट देणार आहेत. त्यानंतर विश्रामगृह येथे 9 वाजता पत्रकार परिषद आणि 10 वाजता लाभार्थी व मच्छीमारांची भेट, मग हुतात्मा स्तंभ, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, सरखेल कान्होजी आंग्रे समाधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, तसेच संत सेवालाल मंदिर येथे ते अभिवादन करतील. पुढे भाग्यलक्ष्मी हॉल येथे प्रकल्पग्रस्तांचा मेळावा, चरी येथे आंदोलनातील व्यक्ती व त्यांच्या परिवाराचा सत्कार सोहळा, मग पेझारी चेक पोस्ट आणि वाशी नाका येथे यात्रेचे स्वागत असे मार्गक्रमण करून ते पेणकडे प्रयाण करतील. दुपारी 12.45 वाजता पेण येथे आमदार रविशेठ पाटील यांच्या निवासस्थानी मूर्तिकारांची भेट, त्यानंतर पनवेलकडे रवाना होत असताना खारपाडा येथे स्वागत, 2.15 वाजता शिरढोण येथे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मारकास भेट देऊन ते अभिवादन करणार आहेत. त्यानंतर पळस्पे फाटा येथे स्वागत, 3 वाजता पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यास ते अभिवादन करणार आहेत. मग 3.10 वाजता आगरी समाज सभागृहात लाभार्थी भेट कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी 4.30 वाजता उरण तालुक्यातील जासई येथे हुतात्मा स्मारकास अभिवादन करून लोकनेते दि. बा. पाटील मंगल कार्यालय येथे प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्यास ते संबोधित करतील. त्यानंतर सायंकाळी 5.30 वाजता नवी मुंबईतील जनआशीर्वाद यात्रेच्या कार्यक्रमांसाठी मंत्रीमहोदय रवाना होणार आहेत.

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply