Breaking News

स्वमग्नता दिनाच्या निमित्ताने…

ऑटिझमग्रस्त असलेल्या व्यक्तीचे आयुष्य सुंदर आणि सुसह्य बनवण्यासाठी डॉक्टर, पालक व समुपदेशक अशा सगळ्यांनी या आजाराचा स्वीकार करून त्या मुलाला समाजामध्ये ताठ मानेने जगण्यासाठी 2 एप्रिल रोजी जागतिक स्वमग्नता दिन पाळला जातो. आपल्या समाजामध्ये आजही स्वमग्न मुलांना सन्मानाने वागविले जात नाही याउलट त्याची टिंगलटवाळी करण्यावर जास्त भर दिला जातो. ऑटिझम म्हणजेच स्वमग्नता म्हणजे

नेमकं काय ते माहीत नसल्यामुळे अशा मुलांना अनेक वेळा ‘मतिमंद’ समजले जाते, परंतु मतिमंद आणि ऑटिझम यात बराच फरक आहे. मूल 2 ते 3 वर्षांचं होईपर्यंत त्याच्या पालकांनाही स्वमग्नतेबाबत कल्पना नसते. कधी कधी तर 8-10 वर्षांपर्यंतही काहीही लक्षात येत नाही. ऑटिझम हा बालपणात मज्जातंतूंच्या विकासाशी (न्युरो डेव्हलपमेंट) संबंधित विकार आहे. मेंदूतील काही भागांच्या अकार्यक्षमतेमुळे या मुलांची मानसिक क्षमता विकसित होत नाही. यामुळे अर्थबोध, विचार करण्याची क्षमता, वाचा, संवाद साधणे व वागणे यात समस्या निर्माण होतात. ही मुले इतर मुलांसारखी दिसत असली, तरी त्यांचे दैनंदिन जीवन इतरांसारखे नसते. ऑटिझमग्रस्त मुलांच्या काही समस्या वेगळ्या असतात. त्यांची विशेष काळजी घेण्याची गरज असते. या आजाराविषयी अधिक माहिती देताना स्वमग्न मुलांसाठी कार्यरत असलेल्या बालविकास तज्ज्ञ व निरामय गायडन्स क्लिनिकच्या संचालिका डॉ. अंजना थडानी सांगतात, ऑटिझमने ग्रस्त असलेल्या मुलांना सांभाळणे आणि त्यांच्यावर उपचार करणे अत्यंत आव्हानात्मक काम मानले जाते. मतिमंद मुलांचा बुद्ध्यांक सरासरीपेक्षा कमी असतो, तर ऑटिझमग्रस्त मुलांचे बुद्ध्यांक सरासरी म्हणजे सत्तरच्या वर असू शकतो. पाच टक्के मुलांचा सरासरीहून अधिक म्हणजे शंभरपर्यंत असू शकतो, परंतु त्या मुलांना स्वतःला व्यक्त करता येत नसल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. ऑटिस्टीक मुलांना नुसतेच शाळेत घालून उपयोग नसतो, प्रत्येक मुलाची क्षमता, कल लक्षात घेऊन त्याप्रमाणे शिक्षण देणे आवश्यक ठरते. स्पीच थेरपी, फिजिओ थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, म्युझिक थेरपी, डान्स ड्रामा थेरपीचा वापर करावा लागतो. शैक्षणिक विकास पद्धती, कल्पकतेचा वापर करून शिकवावे लागते. ज्याचा उपयोग मुलांना व्यावसायिकरीत्या सक्षम करण्यासाठी होऊ शकतो. तारे जमीन पर हा अमोल गुप्ते व आमीर खान यांचा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर डिस्लेक्सिया या आजारावर

समाजामध्ये एक चांगली चर्चा घडवून आणली होती व पा या चित्रपटाद्वारे सुद्धा एका गंभीर आजाराची मांडणी योग्यरीत्या करण्यात आली. स्मिता तळवलकर यांनी बनविलेल्या चौकट राजा, तसेच नुकत्याच आलेल्या कच्चा लिंबू या चित्रपटाने गतिमंद मुलांच्या आई-वडिलांची कशी कुचंबणा होते हे दाखवले होते. स्वमग्नता या आजाराविषयी समाजात जनजागृती करावयाची असेल, तर भारतातील चित्रपट क्षेत्राने यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. आज भारतामध्ये दरवर्षी हजारोंच्या संख्येने चित्रपट निर्माण केले जातात म्हणूनच स्वमग्नता व त्या संबंधित आजारांवर दरवर्षी चित्रपट आले, तर

समाजाचा दृष्टिकोन नक्कीच बदलण्यास हातभार लागेल.

मुलांमध्ये ऑटिझम होण्याच्या

समस्येबाबत सांगताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरच्या बालरोगतज्ज्ञ आणि निओनॉलॉजिस्ट डॉ. मनीषा शिरोडकर सरदार सांगतात, जनुकीय, अर्भकावस्थेतील गुंतागुंत, आईची जीवनशैली व तणावाचे

प्रमाण हेही या विकारास कारणीभूत ठरू शकते. गरोदरपणाच्या काळात काही औषधांचे सेवन हेही ऑटिझमच्या कारणांपैकी एक कारण असू शकते. सतत ताप येत असेल, अचानक फ्लूची लागण होत असेल, तर किंवा कुठलेही अँटिबायोटिक्स घेण्यापूर्वी  डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वातावरणात असलेल्या टेराटोजेन्स आणि पार्‍याच्या प्रमाणामुळेही अपत्याला जन्मजात ऑटिझमचा विकार असू शकतो. आनुवंशिकता, पालकत्वाचे वाढलेले वय, गर्भावस्थेतील होणारे काही आजार, ऑक्सिजनची कमतरता, प्रिमॅच्युअरमुळे उद्भवणारे काही आजार, जन्मानंतर निर्माण होणारे मेंदूतील काही प्रकारचे संसर्ग, सामाजिक जीवनशैली ही प्रमुख वैद्यकीय कारणे ऑटिझम आजाराची आहेत. आज संपूर्ण जगामध्ये 7 करोडहून अधिक स्वमग्न नागरिक आहेत व यातील एक करोडहून अधिक नागरिक (यात लहान मुलांचा

समावेश आहे) भारतामध्ये आहेत.

ऑटिझमवरच्या उपचारपद्धतीवर सध्या जगभरात संशोधन सुरू आहे, पण सध्या तरी हा विकार पूर्ण बरा करू शकणारे उपचार विज्ञानाकडे नाहीत. त्यामुळेच ऑटिझमग्रस्त मुलाच्या कुटुंबाची, समाजाची जबाबदारी अधिक वाढते. म्हणूनच प्रत्येकाने जबाबदारीने या आजाराविषयी सखोल माहिती करून घेणं कधीही सोयीस्कर असतं. ऑटिझमने ग्रस्त असलेल्या मुलांना सांभाळणे आणि त्यांच्यावर उपचार करणे अत्यंत आव्हानात्मक काम मानले जाते. ऑटिस्टिक मुलांच्या प्रश्नांना सहानुभूतीची किनार असते. त्याऐवजी समाजाने पुढाकार घेऊन या मुलांना मुख्य प्रवाहात सामावून घ्यायला हवे, अशी मागणी समाजातील सर्वच स्तरातून झाली पाहिजे, तरच ऑटिझम या आजारावर आपण मात करू शकतो, असे मत डॉ. अंजना थडानी यांनी व्यक्त केले.

-उमेश भोगले, नवी मुंबई

Check Also

पेठालीच्या मैदानात आमदार चषक 2025 स्पर्धा; भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्ततळोजा मजकूर येथील श्री कृष्ण क्रिकेट संघाच्या वतीने माजी सरपंच संतोष पाटील …

Leave a Reply