पाली : प्रतिनिधी
अष्टविनायक देवस्थानांपैकी पालीतील बल्लाळेश्वर मंदिर सोमवारपासून दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी आतुर झालेले भक्त भाविक, पर्यटक आता सुखावले आहेत.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. दिवाळी पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार पाली (ता. सुधागड) येथील बल्लाळेश्वर मंदिर आणि महड (ता. खालापूर) येथील वरदविनायक मंदिर सोमवारपासून खुले करण्यात आले.
पालीतील श्री बल्लाळेश्वर मंदिर प्रवेशद्वारावर हॅण्ड सॅनिटाझर व थर्मल स्कॅनिंग होत आहे. प्रत्येक भाविकाला मास्क अनिवार्य असणार आहे. सुरक्षीत अंतरासाठी सहा फुटांवर सर्कल केले आहेत. भाविकांना सभामंडपातूनच श्रींचे दर्शन घेता येईल. भाविकांनी नियमांचे पालन करून ट्रस्टला सहकार्य करावे.
-अॅड. धनंजय धारप, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली ता. सुधागड
मुरुड : प्रतिनिधी
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या मार्च महिन्यापासून बंद असलेले नांदगावचे सुप्रसिध्द श्री सिध्दिविनायक मंदिर सोमवारी (दि. 16) सकाळी सात वाजता दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर उघडण्यात आले. मात्र श्री सिध्दिविनायकाचे केवळ मुखदर्शन घेता येणार असल्याने भाविकांची थोडी निराशा झाली.
पुजारी विनायक पुरुषोत्तम जोशी यांनी सोमवारी पहाटे श्रींची पाद्यपुजा केली. या वेळी सेवा मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र जोशी, कर्मचारी प्रणाली साखरकर, श्रावणी देऊळकर, मनोहर मोकल आदी उपस्थित होते. त्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून भक्तांना मंदिरात सोडण्यात आले. मंदिराचा गाभारा बंद ठेवण्यात आल्याने भक्तांना लांबूनच श्रींचे मुखदर्शन घ्यावे लागले.