कर्जत : बातमीदार
तालुक्यातील नेरळजवळील पिंपळोली गावामध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन मिनीबस मंगळवारी (दि. 17) रात्री आगीत जळून खाक झाल्या. यात सुमारे 18 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळोली गावातील चंद्रकांत सोनावळे हे साई एकवीरा ट्रान्सपोर्ट नावाने वाहतूक व्यवसाय करतात. सध्या त्यांच्याकडे तीन मिनीबस आहेत. नेरळ-कर्जत रस्त्यावर असलेल्या हाजी लियाकत स्कूलमधील विद्यार्थ्यांना स्कूल बस म्हणून सेवा देत होते. गावातील एका बँड पथकाला सोनावळे हे आर्थिक मदत करतात. मंगळवारी संध्याकाळी पिंपळोली एसटी स्टँड परिसरात सराव करीत असताना बँड पथकातील तरुणांमध्ये बाचाबाची झाली. त्याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. त्यानंतर रात्री 11 वाजेच्या सुमारास चंद्रकांत सोनावळे यांच्या तीन मिनीबस (एमएच 04-बीयू3163, एमएच 02-पीके 0324 आणि एमएच 06-जे 9604) यांना आग लागली. त्यात या तीनही मिनीबस जळून खाक झाल्या. सोनावळे यांनी याबाबत माहिती देताच नेरळ पोलीस घटनास्थळी पोहचले. बुधवारी (दि. 18) सकाळी पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली. जिल्हा पोलीस दलाच्या गुप्तचर विभागाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले होते.