Breaking News

पावसाच्या तडाख्यातून आजीबाईंना वाचविले; पोलीस शिपायाची कामगिरी

मुरूड : प्रतिनिधी – नागरिकांच्या रक्षणासाठी कार्यरत असणार्‍या पोलीस खात्याची सामाजिक बांधिलकी पुन्हा दिसून आली आहे. एका 77 वर्षीय वृद्ध महिलेला पोलीस शिपाई सागर जनार्दन रसाळ यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे नातेवाईकांची भेट घडली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती असे की, मुरूड पोलीस ठाण्याचे शिपाई सागर रसाळ आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना शहरातील दस्तुरी नाक्यावर वृद्ध महिला भरपावसात रस्त्याच्या एका पडिक जागेत दिसून आली. आजूबाजूला चौकशी केली असता, कुणीही या वृद्ध महिलेला कोणीही ओळखत नव्हते. ही महिला भूक आणि तहानेने व्याकूळ झालेली होती. सागर रसाळ यांनी तिला आधार देऊन नगर परिषदेच्या जकात नाका येथील रूमवर ठेवले आणि याची कल्पना नगराध्यक्ष स्नेहा पाटील यांना दिली. नगराध्यक्षांची मान्यता मिळाल्यावर रसाळ यांनी स्वखर्चाने जेवण व पाणी त्या महिलेला दिले. यानंतर पुन्हा रात्री जाऊन तिला अंगावर चादर व जेवण दिले.

दुसर्‍या दिवशी तपास करीत असताना टक्याची वाड्याच्या शेतावर काही महिलांना वृद्ध महिलेचा फोटो दाखविला असता, त्यांनी ही आमची आजी असल्याचे सांगितले. मग नातेवाइकांनी घटनास्थळी येऊन आजीची विचारपूस केली. ओळख पटल्यावर पोलीस शिपाई रसाळ यांनी तिला नातेवाइकांच्या ताब्यात दिले. याबद्दल रसाळ यांचे कौतुक होत आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply