पनवेल : वार्ताहर
पनवेल परिसरात तसेच नवी मुंबईत सोनसाखळी चोरीप्रकरणी धुमाकूळ घालणार्या एका सराईत गुन्हेगारी टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाला यश आले असून त्यांच्यामुळे 20 पेक्षा जास्त गुन्हे उघडकीस आले आहेत.
पनवेलसह नवी मुंबई परिसरातील सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ वाढला होता. याबाबत गुन्हे शाखा युनिट 2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी पदभार स्वीकारताच या टोळीला गजाआड करण्याचा विडा उचलला. याकामी त्यांना नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांच्यासह सहाय्यक आयुक्त गुन्हे शाखा विनोद चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी यासाठी त्यांच्याकडे कार्यरत असलेल्या सहाय्यक निरीक्षक गणेश कराड, संदीप गायकवाड, शरद ढोले, प्रवीण फडतरे यांच्यासह हवालदार सुनील साळुंखे, पवार, तरकसे, वाघ, गडगे, पाटील, सुर्यवंशी, पाटील, बैकर, नाईक कुदळे, पाटील, म्हात्रे, कानू, पवार, मोरे, पो.ना.पाटील, शिपाई फुंडे, पाटील, भोपी, फौजदार एस. पाटील, आदींच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी सापळे रचून या गुन्ह्यातील सराईत आरोपी तन्वीर मोहम्मद इब्राहिम शेख ऊर्फ दीपक, अखिल शरीफ खान, तरशरुफ ब्रैद्दुर रहमान शेख, सर्व रा.मानखुर्द, मुंबई, शबनम शब्बीर शेख आणि हरून लाला सय्यद दोघेही रा.पनवेल यांना ताब्यात घेतले असून, त्यांनी तब्बल 20 गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली आहे.
या वेळी त्यांच्याकडून दोन मोटरसायकल आणि 38 तोळे सोने असे एकूण 20 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.