Breaking News

ठाकरे महापरिवाराचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे का?

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा सवाल

कर्जत : प्रतिनिधी
ठाकरे महापरिवार अनेक ठिकाणी जमिनी विकत घेत आहे. ते का जमिनी घेतात? त्यांचा जमिनी खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे काय, असा प्रश्न पडला आहे. रायगड जिल्ह्यात ठाकरे महापरिवाराने अनेक जमिनी घेतल्या आहेत. कोर्लईमध्ये त्यांनी जागा घेतली. कर्जत तालुक्यातही जागा घेतली आहे. काही जमिनींच्या सर्व्हे नंबरचा दोन-दोन वेळा त्यांच्या सत्य प्रतिज्ञापत्रात उल्लेख आहे. म्हणजे खुद्द मुख्यमंत्र्यांना कुणी तरी फसवले आहे असे वाटते. ज्या कुणी त्यांना फसवले आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे, असे भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. ते शुक्रवारी (दि. 20) कर्जत येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी त्यांनी जमिनीच्या व्यवहारांकडे लक्ष वेधले.
भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला सोमय्या यांच्यासह भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, किसान मोर्चाचे सुनील गोगटे, दीपक बेहरे, रमेश मुंढे, अ‍ॅड. हृषिकेश जोशी, किरण ठाकरे आदी उपस्थित होते.
सोमय्या पुढे म्हणाले, कोर्लई येथील अन्वय नाईक यांची जमीन रश्मी ठाकरे व मनीषा वायकर यांनी विकत घेतली आहे. ती मी आज पाहून आलो. या जमिनी त्यांनी का घेतल्या असा प्रश्न पडला आहे. ठाकरे महापरिवाराचा हा व्यवसाय आहे काय? तसे असेल तर त्यांनी ते सांगावे. याबाबत मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारले, पण अद्याप उत्तर मिळाले नाही. कर्जत तालुक्यातील वैजनाथ येथील जमीनही ठाकरे महापरिवारातील सदस्यांच्या नावावर आहे असे मुखमंत्र्यांनी आपल्या सत्य प्रतिज्ञापत्रात जाहीर केले आहे, मात्र वैजनाथ देवस्थानच्या जमिनीबाबत काही तरी गोंधळ आहे अशी शंका येते.
राज्य सरकारने आवश्यक उपाययोजना केली नाही -आमदार प्रशांत ठाकूर
आमदार प्रशांत ठाकूर यांनी, कोरोनाकाळात जी उपाययोजना करण्याची आवश्यकता होती ती राज्य सरकारने केली नाही. सर्वच शहरांत बिकट परिस्थिती होती. किरीट सोमय्यांनी अनेक ठिकाणी पाहणी केली. भारतीय जनता पक्षाने अनेक ठिकाणी मदतही केली. कोणत्याही संकटात मदत करण्यासाठी सोमय्या नेहमीच पुढे असतात. आज ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांनी रायगड जिल्ह्यात ज्या जमिनी घेतल्या आहेत त्याबद्दल माहिती घेण्यासाठी आले आहेत, असे स्पष्ट केले.

Check Also

पनवेल ग्रामीण भागातील रस्त्यांचा होणार विकास

50 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश पनवेल …

Leave a Reply