नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – पुण्याहून मुंबईला जाणार्या खासगी बसला आग लागल्याची घटना सानपाडा येथे घडली. कुरियरच्या कार्यालयासमोर बस थांबलेली असताना ही दुर्घटना घडली. यामध्ये एक जण जखमी झाला असून 35 प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.
सायन-पनवेल मार्गावर शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आकांक्षा टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्सची बस मुंबईच्या दिशेने चालली होती. सानपाडा येथे बस थांबली असता बसमध्ये आग लागली. बसमधील प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले. यामुळे मोठी जीवितहानी टळली, मात्र आगीचा भडका उडाल्याने प्रवासी मुकेश क्षीरसागर हे भाजले गेल्याने जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
आगीची माहिती मिळताच सानपाडा पोलीस व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही, मात्र बसमधील प्रवाशांकडे असलेल्या सॅनिटायझरमुळे आग भडकल्याची शक्यता आहे. या प्रकरणी बसचालक व मालक यांच्या विरोधात सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.