Breaking News

शाळा सुरू; विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

मोहोपाड्यात पालकांकडून संमतीपत्र देण्यास नकार

मोहोपाडा : प्रतिनिधी – राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थीसंख्या कमी आहे. पालक जबाबदारी घेण्यास तयार नाहीत, मात्र मोहोपाड्यात रिलायन्स फाऊंडेशनची धीरूभाई अंबानी, सेंट जोसेफ, प्रिया, पिल्ले या शाळा बंद असून त्यांच्या अटी-शर्तीस पालकांचा नकार आहे.

राज्य शासनाने शाळा सुरू करण्याबाबत जरी निर्देश दिले असले तरी पालक मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत असे आजचे चित्र होते. खालापूर तालुक्यातील 47 शाळांपैकी जेमतेम 10 शाळा सुरू झाल्या असून 162 विद्यार्थी हजर होते. त्यांनाही लवकर सोडण्यात आले. ज्या खासगी शाळा आहेत त्यांच्या व्यवस्थापनाने घातलेल्या अटी-शर्तीस पालकांनी मान्यता न दिल्याने आजही शाळेचे गेट बंद आहे.

चौक येथील सरनोबत नेताजी पालकर व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या 600 पैकी 85 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली, तर न्यू इंग्लिश स्कूल वावर्ले सात व विद्यामंदिर सारंग येथे 18 विद्यार्थी हजर होते. त्यांच्या पालकांकडून अद्यापही संमतीपत्र शाळेला मिळाले नाही, तर संमतीपत्र नसल्याने विद्यार्थ्यांना परत पाठविले जात आहे. या तिन्ही शाळांतील शिक्षक व कर्मचार्‍यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात एक शिक्षक पॉझिटिव्ह व दोन शिक्षकांचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले नाहीत.

तिन्ही शाळांचा परिसर स्वच्छ ठेवला असून सॅनिटाइज करण्यात आले आहे. ऑक्सिमीटर व थर्मल मशिनद्वारे विद्यार्थ्यांची तपासणी झाली असता सर्वच विद्यार्थी निगेटिव्ह आहेत. आज शाळा सुरू होणार म्हणून कोणत्याच शाळेत ऑनलाइन लिंक उपलब्ध झाली नाही, असे मुख्याध्यापकांनी सांगितले.

ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्याची मागणी

विद्यार्थ्यांची सर्वच जबाबदारी पालकांनी घेऊन शाळेत आणण्यापासून ते घरी जाईपर्यंत पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे ही अट आहे, मग शाळा व्यवस्थापनाचे कार्य काय? असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत. त्यामुळेच ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवावे, अशी मागणी पालकांची आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply