20 शिक्षकांना कोरोनाची लागण
अलिबाग : प्रतिनिधी
राज्य सरकारच्या निर्देशानुसार कोरोनाच्या आठ महिन्यांनंतर इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सोमवार (दि. 23)पासून सुरू झाल्या, मात्र शिक्षकांच्या कोरोना तपासणीअभावी रायगड जिल्ह्यातील 644 पैकी 229 शाळा सुरूच होऊ शकल्या नाहीत. दुसरीकडे ज्या शाळा सुरू झाल्या तेथे विद्यार्थ्यांची अत्यल्प उपस्थिती होती. दरम्यान, आतापर्यंतच्या चाचणीत 20 शिक्षक आणि एका शिक्षकेतर कर्मचार्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
पनवेल महापालिका वगळता इतर सर्व तालुक्यांतील शाळा सुरू करण्यास जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मंजुरी दिली होती.
याबाबतचे आदेशही त्यांनी जारी केले होते, पण शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले होते, मात्र चार दिवसांत जवळपास सात हजार 159 शिक्षकांची कोरोना तपासणी करणे अशक्य आहे. यापैकी तीन हजार 106 शिक्षकांची चाचणी करण्यात आली आहे. यातील 20 शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे, तर चार हजार शिक्षकांची कोरोना चाचणी होणे अद्याप शिल्लक आहे.
याचबरोबर माध्यमिक शाळांमध्ये तीन हजार 190 शिक्षकेतर कर्मचारी काम करतात. यापैकी एक हजार 158 कर्मचार्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यातील एकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. अद्यापही जवळपास दोन हजार कर्मचार्यांची तपासणी करणे शिल्लक आहे.
शासनाच्या निर्देशानुसार 644 पैकी 229 शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. पनवेलमधील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत, तर उर्वरित शाळा येत्या काही दिवसांत सुरू होतील. शाळेच्या पहिल्या दिवशी एक लाख 35 हजार 797 पैकी केवळ सहा हजार 66 विद्यार्थी शाळेत उपस्थित होते.
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती खूपच कमी आहे, परंतु ती वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी पालक किंवा विद्यार्थ्यांवर कुठलाही दबाव आणला जाणार नाही. कोरोना अहवाल निगेटिव्ह असणार्या आणि सुरक्षेची सर्व जबाबदारी बजावणार्या शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त ऑनलाइन शिक्षण सुरूच राहणार आहे.
-भाऊसाहेब थोरात, शिक्षणाधिकारी, रायगड