गुन्हे शाखा कक्ष 2ची कारवाई
पनवेल : वार्ताहर
गुन्हे शाखा कक्ष 2 यांनी मागील आठवडयातच सोनसाखळी चोरी करणार्या टोळीला अटक केलेली आहे. त्यांचेकडून 20 लाखांचे दागिन्यासह नवी मुंबई आयुक्तालयातील सोनसाखळीचे 20 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. या टोळीतील काही सदस्य फरार असल्याने पोलिसांच्या पथकाने शोध घेऊन सोनसाखळी गुन्ह्यातील पाहिजे आरोपी व सदर टोळीचा प्रमुख मोहम्मद शब्बीर शकिल शेख (28) यांस अटक करण्यात आली. तसेच त्याच्याकडे असलेले विनापरवाना देशी बनावटीचे रिव्हॉल्वर व एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे.
गुन्हे शाखा कक्ष 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांना गोपनिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, नवी मुंबई आयुक्तालयातील 20 जबरी चोरीच्या सोनसाखळी गुन्हयातील पाहिजे आरोपी व सदर टोळीचा प्रमुख मोहम्मद शब्बीर शकिल शेख (28) हा मागील दोन दिवसांपासून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मानखुर्द येथे न राहता बेलापूर, उलवा या परिसरात रिक्षा चालवित असल्याची माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या अनुशंगाने अपर पोलीस आयुक्त, गुन्हे डॉ. बी. जी शेखर पाटील यांनी आखुन दिलेल्या पध्दतीने बेलापूर व उलवा परिसरामध्ये गुन्हे शाखा 2 वे वरिष्ठ निरीक्षक गिरीधर गोरे, सहाय्यक निरीक्षक संदिप गायकवाड, शरद ढोले, प्रविण फडतरे यांची वेगवेगळी पथके तयार केली. त्या पथकामार्फत बेलापूर व उलवा परिसरात सापळा लावण्यात आला. पाहिजे आरोपी मोहम्मद शब्बीर शकिल शेख हा ऑटो रिक्षा (क्र. एम एच 43 बीआर 1507) सह बेलापूर गावामध्ये मिळून आल्याने त्यास तात्काळ ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्यावे शर्टच्या आत डाव्या बाजूस कमरेजवळ एक विनापरवाना देशी बनावटीचे रिव्हॉल्वर व एक जिवंत काडतूस बेकायदेशिर रित्या बाळगलेले मिळून आले. म्हणून नमूद अट्टल गुन्हेगार मोहम्मद शब्बीर शकिल शेख (रा . कृष्णा भेंडे चाळ , रूम नं 7 , जुई गाव , ता – पनवेल, जिल्हा रायगड ) याच्याविरूध्द् एनआरआय पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह , अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) बी. जी. शेखर पाटील, उप आयुक्त (गुन्हे) प्रविण पाटील, सहाय्यक आयुक्त (गुन्हे) विनोद चव्हाण यांच्या मार्गदशनाखाली गुन्हे शाखा, कक्ष 2 चे वरिष्ठ निरीक्षक गिरीधर गोरे, सहाय्यक निरीक्षक गणेश कराड, संदिप गायकवाड, शरद ढाले, प्रविण फडतरे, हवालदार सुनिल सांळुके, मधुकर गडगे, सचिन पवार, तुकाराम सुर्यवंशी, नाईक रूपेश पाटील, सचिन पाटील , इंद्रजित कानु, शिपाई प्रविण भोपी यांनी केली आहे.