Breaking News

मतदारराजासाठी…

लोकशाहीच्या उत्सवात मतदारराजाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, पण बर्‍याच निवडणुकांमध्ये मतदारांची नकारात्मकता मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते. हे टाळणे सर्वस्वी मतदारांच्या हातात आहे. मतदान करा, ते टाळू नका. कारण आपल्या एका मताने देशाचे भविष्य घडणार आहे याची जाणीव सुज्ञ मतदारांनी ठेवणे गरजेचे आहे.

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्याने देशातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापले आहे. आरोप, प्रत्यारोपांच्या फैर्‍या यापूर्वीच झडू लागल्या आहेत. त्या फैर्‍यांना आता चांगलीच धार येणार आहे. या वेळी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी विरोधात काँग्रेसप्रणित महाआघाडी असाच सामना रंगणार आहे. या सामन्यात कुणाला निवडून द्यायचे आणि कुणाला घरी बसवायचे याचा निर्णय एक दिवसाचा राजा असलेला मतदारराजाच घेणार असल्याने देशातील सर्वच पात्र मतदारांचा भाव राजकीय पक्षांसाठी कमालीचा वधारला आहे.देशात लोकशाही मोठ्या प्रमाणात रुजली असल्याने मतदारही कमालीचा सजग झाला आहे. शहरी मतदारापेक्षा ग्रामीण मतदार मतदान आणि निवडणुकीबाबत कमालीचा आग्रही असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या वेळीही ग्रामीण भागातील मतदार शहरी मतदारापेक्षा सर्वाधिक अग्रेसर राहणार आहे. आता कुणाला मतदान करायचे हा अधिकार संविधानाने प्रत्येक मतदाराला दिला असल्याने मतदारराजाही योग्य त्याच उमेदवाराला मतदान करून देशाची लोकशाही बळकट करीत आहे. राजकीय पक्षही जनमताचा आदर करीत मिळालेला कौल स्वीकारत आहेत. यामुळे भारतातील लोकशाही अधिृक दृढ होताना दिसत आहे. या लोकशाहीचा जगातील लोकशाही देशांना मोठा अभिमान आहे.आतासुद्धा अवघ्या जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. शेकडो पक्ष आणि हजारो उमेदवार या निवडणुकीत आपले राजकीय भवितव्य आजमावतील, पण त्यातून अचूक पक्ष आणि उमेदवार निवडून देण्याची किमया केवळ भारतीय मतदारच करू शकतो हे सिद्ध झाले आहे. सतराव्या लोकसभेतही असेच अचूक उमेदवार आणि देशाची काळजी करणार्‍या सुदृढ राजकीय पक्षाकडेच भारतीय मतदार सत्ता सोपवतील आणि पुढील पाच वर्षे निर्धास्त राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशातील मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मतदान करणे हे प्रत्येक मतदाराचे प्रथम कर्तव्य आहे याची जाणीवही पंतप्रधानांनी सर्व सुज्ञ मतदारांना करून दिली आहे. मतदान न करणे हा सामाजिक गुन्हाच असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले आहे. मतदान कुणाला करायचे ते करा, पण मतदान करणे टाळू नका, असेही पंतप्रधानांनी सूचित केले आहे. आपल्या एका मताने देशाचे भवितव्य घडत असते. अशा वेळी यामध्ये एक मतदार म्हणून आपलाही सहभाग असणे गरजेचे आहे, याची जाणीवदेखील मोदी यांनी देशातील सर्व पात्र मतदारांना करून दिली आहे. मतदान प्रक्रियेत मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकारी यंत्रणा विविध स्तरावर प्रयत्नशील आहे. त्यासाठी कोट्यवधींचा खर्चही केला जात आहे. दुर्दैवाने लोकसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी पाहिली की कोट्यवधींचा खर्च वाया गेला असे वाटू नये, एवढीच माफक अपेक्षा.

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply