Breaking News

लढाई की भ्रष्टाचार?

कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली असून कोविड रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा मागोवा घेण्याचे अर्थात ट्रेसिंगचे काम अतिशय प्रभावीपणे सुरू आहे, असे ठाकरे सरकारतर्फे वारंवार सांगण्यात येत आहे. या प्रयत्नांमुळेच कोविडविरुद्धची लढाई आपण जिंकत आलो आहोत असा आविर्भाव सरकारने आणला आहे. प्रत्यक्षात मात्र किती सावळागोंधळ आहे हे नवी मुंबईतील बनावट कोरोना अहवालांवरून दिसतेच.

कोरोना विषाणूच्या विरुद्ध संपूर्ण शक्तिनिशी महाराष्ट्र लढतो आहे आणि या लढाईमध्ये आम्ही विजय मिळवणारच अशा गर्जना ठाकरे सरकारने केल्या खर्‍या. पण त्या किती पोकळ आहेत याची उदाहरणे आता हळूहळू बाहेर येत आहेत. नवी मुंबई येथील एका कोविड सेंटरकडून शेकडो लोकांना बनावट कोरोना चाचण्यांचे अहवाल दिले गेले आहेत. म्हणजे ज्यांनी कोविडची चाचणी केलीच नव्हती, त्यांना देखील ते निगेटिव्ह असल्याचा अहवाल मिळाला आहे. हा चमत्कार पाहून संबंधितरहिवासी बुचकळ्यात पडले नसते तरच नवल. या कोविड सेंटरवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा आकडा फुगवण्यासाठी हा उद्योग केल्याचे निष्पन्न झाले आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते व भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणी आवाज उठवला नसता तर सारेच प्रकरण आपोआप दडपले गेले असते. एखादा कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास नियमाप्रमाणे त्याला विलगीकरणात पाठवले जाते व त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची चौकशी करून त्यांच्याही चाचण्या केल्या जातात. हे सारे नियमावलीनुसार बंधनकारक आहे. परंतु काही ठिकाणी हा नियम सरसकट पायदळी तुडवला जाताना आढळून आले आहे. नवी मुंबईतील कोविड सेंटरमध्ये काही युवकांनी चाचणी करून घेतली. ती चाचणी पार पाडतानाच त्या केंद्रावरील कर्मचार्‍यांनी त्यांच्या कुटुंबीयांची माहितीही विचारून घेतली. नाव व पत्ते नोंदवून घेतले आणि कोविड चाचणीचे निगेटिव्ह अहवाल त्यांच्याकडे पाठवून दिले. कुठेही चाचणी न केलेल्या नवी मुंबईतील या रहिवाशांना आपली चाचणी नेमकी झाली कधी असा प्रश्न पडणे साहजिकच होते. या प्रकाराची उघड चर्चा सुरू झाल्यानंतर भाजप नेते दरेकर यांनी त्यात लक्ष घातले, तेव्हा त्याची व्याप्ती लक्षात आली. यात गावी गेलेल्या महिलेला तसेच मृत व्यक्तीलाही निगेटिव्ह अहवाल देण्यात आला आहे. असाच प्रकार अन्य ठिकाणीही होत असला पाहिजे अशी शंका घेण्यास नक्कीच जागा आहे. निव्वळ आकडे फुगवून यंत्रणेवरील खर्चात भ्रष्टाचार करायचा असा प्रकार यामागे असावा. माजी मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुरूवातीपासूनच आकडेवारीच्या खेळाकडे लक्ष वेधले आहे. सध्या राज्य सरकारकडून माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेची मोठी भलामण केली जाताना दिसते. कोविडविरुद्धची लढाई जणु त्यामुळेच महाराष्ट्राने जिंकली असा दावा केला जातो. परंतु नुसती भाषणबाजी करून किंवा घोटाळे करून कुठलीच लढाई जिंकता येत नसते याचे भान राज्य सरकारने ठेवायला हवे. कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते हे भय सार्‍यांच्याच मनात आहे. अशा वेळी गाफिल राहून चालणार नाही. खोट्या चाचण्या, फुगवलेली आकडेवारी यामुळे काही जणांचे उखळ पांढरे होईल. पण असल्या भ्रष्टाचारात निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात येतो हे सरकारच्या कधी ध्यानात येणार?

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply