Breaking News

पंतप्रधान मोदींचे ‘मिशन व्हॅक्सिन’

पुण्यात ‘सीरम’मध्ये केली लसनिर्मितीची पाहणी

पुणे ः प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. 28) देशातील कोरोनाविरोधातील लस विकसित करणार्‍या प्रमुख कंपन्यांना भेट देऊन ’मिशन व्हॅक्सिन’ पूर्ण केले. पंतप्रधान मोदींनी अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन कोरोना लस निर्मितीसह उत्पादनाबाबत आढावा घेतला. पंतप्रधान मोदी जवळपास तासभर सीरममध्ये होते. त्यामुळे कोरोना लसीबाबत लवकरच दिलासादायक वार्ता मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात असताना त्यावर मारा करण्यासाठी कोरोना लस हाती येणे अत्यंत आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता कोरोना लसीच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी एकाच दिवशी अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे या तीन शहरांचा दौरा करीत संबधित संस्था व कंपनीना भेट देत लस उत्पादनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. एवढेच नाही तर लस निर्मात्या कंपन्या आणि शास्त्रज्ञांना कामगिरीबद्दल शुभेच्छाही दिल्या.

पुणे विमानतळावरून पंतप्रधानांचे हेलिकॉप्टरने मांजरी येथील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आगमन झाले. सीरमचे सायरस पुनावाला आणि अदर पुनावाला यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. या वेळी अदर पुनावाला यांनी पंतप्रधानांना कोरोना लस उत्पादनाबाबत तपशीलवार माहिती दिली. त्यानंतर सीरमच्या शास्त्रज्ञांशीही पंतप्रधानांनी चर्चा केली. या बैठकीनंतर लशीचे उत्पादन सुरू असलेल्या लॅबलाही पंतप्रधानांनी भेट दिली. लशीची निर्मिती, साठवणुकीची तयारी आणि नागरिकांपर्यंत लस कशी नेता येईल यावर त्यांनी शास्त्रज्ञांशी चर्चा केली.

दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटमध्ये अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लशीचे उत्पादन घेण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांनी या लशीचे वितरण करण्याबाबत बैठकाही घेतल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शनिवारी वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. तेव्हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांनी त्यांचे स्वागत केले. ले. जनरल सी. पी. मोहंती, एअर कमांडर एच. असूदानी, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply