नागोठणे : प्रतिनिधी
लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने 27 नोव्हेंबरपासून नागोठणे येथील रिलायन्स कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर प्रारंभ करण्यात आलेले ठिय्या आंदोलन मंगळवारी (दि. 1) पाचव्या दिवशी सुरूच आहे. मात्र आमदार रविशेठ पाटील यांच्या व्यतिरिक्त पालकमंत्री तसेच एकही लोकप्रतिनिधी आणि रिलायन्सच्या अधिकार्यांसह कोणताही सरकारी अधिकारी याठिकाणी पोहोचलेला नाही. दरम्यान, आंदोलनकर्त्यांचा उत्साह दररोज वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. सोमवारी (दि. 30) रात्री सिडको विरोधातील 95 गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅड. सुरेश ठाकूर यांच्यासह सुधाकर पाटील, पुंडलिक म्हात्रे, संतोष पवार, डीवायएफआयचे संदीप पाटील, जेएनपीटीचे विश्वस्त भूषण पाटील, यशवंत म्हात्रे आदींसह कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी भेट देवून आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. हे आंदोलन सनदशीर मार्गाने चालू असून त्याला नक्कीच यश मिळेल. काही अडचण आल्यास आम्ही धावून येवू, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. यावेळी या पदाधिकार्यांकडून आंदोलनकर्त्यांसाठी दहा हजार रुपये देणगी देण्यात आली. लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे मुख्य संघटक राजेंद्र गायकवाड, अध्यक्ष शशांक हिरे, सरचिटणीस गंगाराम मिणमिणे आदींसह इतर पदाधिकारी व आंदोलनकर्ते उपस्थित होते.