अलिबाग ः प्रतिनिधी
जानेवारी 2021 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत मुदत संपणार्या नगर परिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात रायगड जिल्ह्यातील खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, व पोलादपूर या नगरपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे तेथील राजकीय हालचालींना वेग आला असून, प्रशासनही सज्ज होत आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये जानेवारी 2021 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत मुदत संपणार्या राज्यातील दोन नगर परिषदा व 17 नगरपंचायतींमधील सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा व पोलादपूर या नगरपंचायतींची मुदत पुढील वर्षी 24 जानेवारी रोजी संपुष्टात येत आहे. या पाच नगरपंचायतींच्या प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना 2 डिसेंबर रोजी संबंधित नगरपंचायतीच्या तसेच रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्ड व वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
प्रभाग रचनेवर हरकती व सूचना स्वीकारण्यासाठी अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यासाठी 9 डिसेंबरपर्यंत मुदत आहे. यामध्ये खालापूरसाठी खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश शेटे, माणगावकरिता तेथील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांची, पोलादपूरसाठी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विराज लबडे, म्हसळ्यासाठी मुख्याधिकारी मनोज उकिर्डे आणि तळा नगरपंचायतीसाठी मुख्याधिकारी माधुरी मडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सुधागडचे प्रकरण न्यायप्रविष्ट
राज्यातील सर्व तालुक्यांच्या गावांसाठी नगरपंचायती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार रायगड जिल्ह्यात खालापूर, माणगाव, तळा, पोलादपूर, म्हसळा या ठिकाणी नगरपंचायती स्थापन झाल्या. सुधागड तालुक्याचे मुख्यालय पाली येथे आहे. येथील प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने तेथे नगरपंचायत स्थापन होऊ शकलेली नाही.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …