Breaking News

विवाह सोहळ्यांवरही कोरोनाचे सावट

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

नवी मुंबई, पनवेलमध्ये दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याच्या शक्यता वर्तविल्या जात असल्याने याचा परिणाम दिवाळीनंतर होणार्‍या लग्न समारंभावर झालेला आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे अनेकांनी पूर्वनियोजित सोहळे स्थगित केले आहेत, तर मंगल कार्यालयांनीही सावध पावित्रा घेत, पूर्वी केलेले बुकिंग रद्द केले आहे. त्यामुळे लग्न समारंभावर भीतीचे सावट असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. नवी मुंबईसह पनवेल विभागात जवळपास 1,850 मंगल कार्यालये आहेत. दिवाळीनंतर लग्नाचे 10 मुहूर्त आले आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांनी विवाहसाठी लग्नाचे हॉल बुक केले आहेत. मात्र, दुसर्‍या लाटेची चर्चा सुरू झाल्याने अनेकांनी मुहूर्त पुढे ढकलले आहेत. काहींनी याच मुहूर्तावर कोर्टात अगदी साध्या पद्धतीने विवाह समारंभ उरकण्याचा निर्णय घेतला आहे, तर काही मंगल कार्यालयांनीही पूर्वी घेतलेली बुकिंग सुरक्षिततेच्या कारणास्तव रद्द केले आहेत. शहरातील काही बड्या मंगल कार्यालयांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासूनच बुकिंग घेणे बंद केले आहे. हॉलच्या बुकिंगच्या वेळीच नियमाच्या सूचना संबंधितांना दिल्या जातात, तसेच प्रत्येकाला मास्क लावणे आणि शारिरीक अंतर राखणे बंधनकारक आहे, शिवाय हॉलवर तपामान मोजण्याचे यंत्र बसविले आहे. तसेच कोरोनाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते. सरकारच्या निर्देशानुसार लग्न समारंभासाठी केवळ पन्नास लोकांना सहभागी होण्याची परवानगी आहे. त्यानुसार नागरिकही सजग झाले आहेत, असे नवी मुंबईतील मंगल कार्यालयांचे मालक, समाज हॉलचे  व्यावसायिकांनी सांगितले.

साध्या पद्धतीने होताहेत लग्न

दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ होतात. मात्र या महिन्यांमध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची शक्यता वर्तविल्याने अनेक कुटुंबांमध्ये लग्नाचे मुहूर्त पुढे ढकलले, जर काहींनी साध्या पद्धतीने लग्न उरकून घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे. यामुळे मंगल कार्यालये ओस पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

बुकिंग रद्द झाल्याने व्यावसायिक चिंतेत

बहुतेक मंगल कार्यालयांमध्ये मार्चनंतरचे बुकिंग केले गेले आहे. मात्र हे बुकिंगही कायम राहील का याची खात्री मंगल कार्यालय संचालकांना नाही. दिवाळीनंतर रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने काही जणांनी चक्क मंगल कार्यालयांचे बुकिंग रद्द केले आहे. यामुळे मंगल कार्यालयांचे मालक, व्यावसायिक व कामगार चिंतेत पडले आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply