Breaking News

काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांचा महाआघाडीतील नेत्यांना सूचक इशारा

अमरावती : प्रतिनिधी
राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस पुन्हा एकदा दुखावला असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या कार्यशैलीबद्दल टीका केल्याने काँग्रेस नाराज असल्याचे बोलले जात असतानाच प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आणि महिला व बालकल्याणमंत्री  यशोमती ठाकूर यांनी पवारांच्या नावाचा उल्लेख टाळत महाविकास आघाडीतील नेत्यांना सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे महाआघाडीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस यांच्यातील कुरबुरी सातत्याने राजकीय वर्तुळात चर्चेला येताना दिसत आहेत. विशेषत: काँग्रेसमधील नाराजी वारंवार उघड होत आहे. सध्या काँग्रेस नेते राहुल गांधीविषयी करण्यात आलेल्या टीकेमुळे काँग्रेसने महाआघाडीतील नेत्यांना इशारा दिला आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आणि महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विट करीत खदखद व्यक्त केली आहे. ‘आघाडीमधील काही नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आले आहेत. काँग्रेसची कार्याध्यक्ष म्हणून आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की, हे सरकार स्थिर राहावे असे वाटत असेल, तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टिप्पणी करणे टाळावे. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावे. काँग्रेसचे नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे’, असे म्हणत ठाकूर यांनी महाआघाडीतील नेत्यांना सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Check Also

शेकापच्या धामणी आणि धोदानी गावातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांची रविवारी (दि.20)उमेदवारी …

Leave a Reply