Breaking News

पोलादपुरात निराधार मुलीचे लग्न; माणुसकीचा हृदयस्पर्शी सोहळा

पोलादपूर : प्रतिनिधी

आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आजोबांच्या मायेने वाढणार्‍या पोलादपूर तालुक्याच्या देवपूर गावातील दोन मुलींपैकी एकीचा विवाह 20 वर्षांपूर्वी एका दानशूर व्यक्तीने लग्नासाठी मदत करण्याच्या अटीवर देऊ केलेल्या रकमेच्या ठेवीतून सोमवारी (दि. 7) झाला. हा लग्नसोहळा म्हणजे माणुसकीचा हृदयस्पर्शी सोहळा ठरला. देवपूर येथील ह.भ.प. सोपानबुवा पवार यांची कोतवाल बुद्रुक येथे दिलेली भगिनी भारती व तिचे पती अनंत मारुती जाधव या दाम्पत्याचे 20 वर्षांपूर्वी अकस्मिक निधन झाले. त्या वेळी या दाम्पत्यास अक्षता आणि अंकिता या दोन लहान मुली होत्या. आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या मुलींना वृद्ध आजोबा मारुती धोंडू जाधव यांचा आधार होता, पण मारुती जाधव यांना अर्धांगवायू झाल्याने नातींसाठी काय करता येईल या विचाराने विजय दरेकर व गिरीधर दरेकर यांनी कोतवालचे मुंबईस्थित प्रख्यात कथ्थक नृत्यशिक्षक राज दरेकर यांना भेटून परिस्थितीचे वर्णन केले. त्यानुसार राज यांनी दोन्ही मुलींच्या नावे सहा हजार रुपये बँकेत मुदत ठेवीच्या रूपात काळकाई माता कला व क्रीडा सामाजिक संस्थेेकडे सुपूर्त केले. संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी या रकमेचा वापर दोन्ही मुलींच्या विवाहासाठी करण्याचे ठरविले. यानंतर दानशूर व्यक्ती राज यांचेही निधन झाले. त्यानंतर संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी राज यांनी दिलेली रक्कम बँकेत कायम ठेव स्वरूपात जमा केली. यापैकी मोठी मुलगी अक्षता हिचा विवाह सोमवारी असल्याने काळकाई संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी सहा हजार रुपयांचे 20 वर्षांनंतर झालेले 24 हजार रुपये रोख स्वरूपात देवपूर येथे तिचे मामा ह.भ.प.सोपानबुवा पवार, मामी चंद्राताई पवार व अक्षताचे आजोबा पांडुरंग जाधव यांच्याकडे विवाहाच्या पूर्वसंध्येला रविवारी सुपूर्त केले. याखेरिज अक्षताची लहान बहिण अंकिता हिच्या विवाहावेळी दुसरी कायम ठेवीतील रक्कमदेखील देण्यात येणार असल्याचे संस्थेचे  अध्यक्ष राजेश सकपाळ यांनी सांगितले. या माणुसकीच्या सहकार्याची जाणीव लग्नमंडपासह परिसरामध्ये चर्चेत होती.

Check Also

भाजप नेते राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून जनता विद्यालयास पाच लाखांची मदत पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजपचे पनवेल …

Leave a Reply